बिहार निवडणूक जाहीर, दोन टप्प्यात 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 नोव्हेंबरला होणार मतमोजणी
भारतीय निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. दोन टप्प्यातील निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बिहारमधील निवडणूक रणधुमाळीला वेग येईल.


Published : October 6, 2025 at 4:41 PM IST
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
- एसआयआर प्रक्रियेतून मतदार याद्यांचे शुद्धीकरण ३० सप्टेंबरला पूर्ण करण्यात आले
- मोबाईल फोन जमा करण्यासाठी पोलिंग स्टेशनवर सुविधा
- सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग करण्यात येणार
- निवडणूक आयोगाची ४० ॲप आहेत. त्याचं एकत्रिकरण करुन ईसीआय ॲप वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म तयार
- उमेदवारांचा कलर फोटो मशिनवर दिसणार, मतदारांना उपयुक्त सुविधा
- पोस्टल बॅलटची मोजणी शेवटच्या दोन राऊंडच्या पूर्वीच पूर्ण करणे बंधनकारक
- बूथ लेव्हल ऑफिसरबरोबर ईसीआय ॲपद्वारे मतदार थेट बोलू शकणार
- 'बिहार निवडणूक मदर ऑफ ऑल इलेक्शन्स' - ज्ञानेश कुमार
- एकूण साडेआठ लाख कर्मचारी बिहार निवडणुकीसाठी कार्यरत
- बिहार निवडणुका दोन टप्प्यात होणार
- 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 नोव्हेंबरला होणार मतमोजणी
मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी सांगितलं होतं की, बिहारमधील मतदार यादी २२ वर्षांनंतर सुधारित केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. एसआयआर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे बिहारमधील मतदार यादी पूर्णपणे सुधारित करण्यात आली आहे. २२ वर्षांच्या अंतरानंतर अशा प्रकारे मतदार यादीचं शुद्धीकरण झालं आहे. बिहारमध्ये ३० सप्टेंबरला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता ही प्रक्रिया देशभरात राबविली जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग - मुख्य निवडणूक आयुक्तांनी बिहारमधील २४३ सदस्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. नोंदणीनंतर १५ दिवसांच्या आत मतदारांना EPIC कार्ड वितरित केलं जाणार आहे. त्यासाठी एक नवीन मानक कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिट सुविधा देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर जास्त गर्दी टाळण्यासाठी, कोणत्याही बूथवर १,२०० पेक्षा जास्त मतदार नसावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग आणि EVM डेटामध्ये विसंगतीच्या तक्रारी असल्यास VVPAT स्लिपची अनिवार्य पडताळणी करण्यात येणार आहे.
३.६६ लाखांहून अधिक नावे वगळली - बिहार विधानसभा निवडणूक प्रक्रिया चालू विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. ऑगस्टमध्ये मसुदा यादी प्रकाशित होण्यापूर्वी ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतरच्या महिन्याभराच्या दाव्यांमध्ये आणि आक्षेपांनंतर आणखी ३.६६ लाख नावे वगळण्यात आली. अपात्र घोषित झालेले, देशाचे नागरिक नसलेले, मृत्यू झाल्यानं, किंवा इतरत्र स्थलांतरित झालेले आणि नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवण्यात आल्यानं नावे वगळण्यात आली आहेत.

