नवी दिल्ली- विश्व हिंद परिषदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, " बांगलादेशात दुकाने, कार्यालये, महिला, मुले आणि मंदिरे आणि गुरुद्वारा सुरक्षित नाहीत. तिथे दिवसेंदिवस अल्पसंख्याकांची स्थिती वाईट होत चालली आहे.अशा चिंताजनक परिस्थितीत अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि मानवी हक्कांसाठी प्रभावीपणे उपयोजना करणे, ही संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. या परिस्थितीकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही. "
विश्व हिंद परिषदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, "नुकतेच बांगलादेशमध्ये हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. एकट्या पंचगड जिल्ह्यातील २२ घरे, झेनैदहमध्ये २० घरे आणि जेसोरमध्ये २२ दुकाने कट्टरपंथीयांनी लक्ष्य केली आहेत. एवढेच नव्हेतर अनेक जिल्ह्यांमध्ये स्मशानभूमीचीही तोडफोड करण्यात आली आहे. पुढे आलोक कुमार म्हणाले, " बांगलादेश विचित्र अनिश्चिततेत, हिंसाचार आणि अराजकाच्या स्थिती फसला आहे. हसीना सरकारच्या राजीनाम्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. या संकटाच्या काळात भारत बांगलादेशबरोबर खंबीरपणे उभा आहे. बांगलादेशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे"
सीमेवर चोवीस तास कडक नजर ठेवावी- "आजवर भारतानं जगभरातील अत्याचारित समाजाला मदत केली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलं आहे. आलोक कुमार यांनी देशाच्या सुरक्षेबाबतदेखील सरकारला सतर्क केले. ते म्हणाले, "बांगलादेशमधील सर्वच जिल्ह्यात हिंसाचार सुरू आहे. हिंदूंची संख्या 32 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. भारत-बांगलादेश सीमेवरून घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याकरिता सुरक्षा दलांनी सीमेवर चोवीस तास कडक नजर ठेवली पाहिजे."
- बांगलादेशमध्ये आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात पोहोचल्या आहेत. त्या भारत सोडणार की इतर देशामध्ये जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
भारत-बांगलादेश संबंध घनिष्ठ राहिलेत-परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक, त्यांचे व्यवसाय आणि मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्री म्हणाले, " भारत सरकार ढाका येथील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. काळजीवाहू सरकारनं अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासोबतच बांगलादेशातील भारतीय कंपन्यांना सुरक्षा द्यावी, अशी भारत सरकारची अपेक्षा आहे. अनेक दशकांपासून भारत-बांगलादेश संबंध घनिष्ठ राहिले आहेत."
हेही वाचा-