अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून) अतिशय भीषण विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. दरम्यान, भूमी चौहान नावाची तरुणी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावली. विमान पकडण्यास उशीर झाल्यानं तिचा जीव वाचला. अपघातानंतर ती म्हणाली की, "मी सुरक्षित आहे, पण विमान अपघात हृदयद्रावक आहे."
बाप्पा पावला अन् जीव वाचला : अपघाताची माहिती मिळताच भूमी चौहान थरथर कापू लागली. तिचा अक्षरश: थरकाप उडाला. जीव वाचवल्यानंतर, तिनं देवीचे आभार मानले. ती लोकांना फक्त एवढंच सांगत आहे की, देवी मातेनं आणि गणपती बाप्पांनी तिला वाचवले. तसंच "वाहतूक कोंडीमुळं मी विमानतळावर उशिरा पोहोचली. उशीर झाल्यानं विमान पकडता आलं नाही. बोर्डिंगची परवानगी देण्यात आली नाही," असं भूमी चौहान हिनं सांगितलं.
अधिकाऱ्यांनी विनंती मान्य केली नाही : गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान अहमदाबादमध्ये ट्रॅफिक जाममध्ये अडकली होती आणि सुरक्षा तपासणीला 10 मिनिटं उशिरा पोहोचली. त्यावेळी तिनं एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना इमिग्रेशनच्या औपचारिकता पूर्ण करण्याची परवानगी देण्याची विनंती केली, परंतु अधिकाऱ्यांनी ती मान्य केली नाही. त्यामुळं भूमी चौहान या विमान अपघातातून अगदी थोडक्यात बचावली. विमान पकडण्यास उशीर झाल्यानं तिचा जीव वाचला.
उशिरा पोहोचणं ठरलं वरदान : भूमी चौहाननं स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला सांगितलं की, जर मला औपचारिकता पूर्ण करू दिली तर विमानाला आणखी 15 मिनिटं उशीर होईल, ते त्यांना परवडणारे नव्हतं. त्यानंतर, भूमी चौहान हिनं रागानं आपलं सामान उचलून विमानतळावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमानतळावर उशिरा पोहोचणे तिच्यासाठी वरदान ठरलं. त्यानंतर काही मिनिटांमुळे मिस झालेल्या विमानाचा अपघात झाल्याचं तिला समजलं.
मी सुरक्षित आहे. पण... : अपघाताबद्दल समजताच भूमी काही वेळ सुन्न झाली. भूमी चौहान म्हणाली, "विमानतळाबाहेर पडताच मला कळलं की विमान क्रॅश झाले आहे, तेव्हा मी काही वेळ सुन्न झाली. मी माझ्या देवी मातेचं आणि गणपती बाप्पाचे आभार मानते की, मी सुरक्षित आहे. पण ही घटना पूर्णपणे भयानक आहे." दरम्यान, भूमी चौहान ही दोन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली होती. सुट्टी घालवण्यासाठी ती भारतात आली होती. ती लंडनमध्ये पतीसोबत राहते. काल ती पतीकडे परत जाणार होती. मात्र, विमानतळावर उशिरा पोहोचल्यानं तिचा जीव वाचला.
हेही वाचा :