नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी हा उपचारासाठी बेल्जियमला गेला होता. बेल्जियम पोलिसांनी 11 एप्रिल रोजी मेहुल चोक्सीला अटक केली होती. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
कोट्यवधींचा घोटाळा करून चोक्सी फरार : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणाऱया मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली. शनिवारी त्याला अटक करण्यात आली. मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. जवळपास १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. तसंच ईडी आणि सीबीआयनं त्याला वाँटेड जाहीर केलं होतं. मेहुल चोक्सी आजारी असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
कुटुंबासह झाला होता फरार : पंजाब नॅशनल बँकेला अनेक कोटी रुपयांचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी कुटुंबासह देशातून पसार झाले होते. आता मेहुल चोक्सीला अटक करताना, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला असल्याची माहिती पुढे आली.
ईडी, सीबीआयनं केले होते आरोपपत्र दाखल : चोक्सीनं त्याची कंपनी गीतांजली जेम्स आणि इतर काही बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केली. फसव्या पद्धतीनं एलओयू (लेटर्स ऑफ अंडरटेकिंग) जारी करण्यात आले आणि विहित प्रक्रियेचे पालन न करता एफएलसी (फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट) वाढवण्यात आले आणि बँकेचे चुकीच्या पद्धतीनं नुकसान झालं, असा आरोप ईडीनं केलाय. ईडीनं आतापर्यंत चोक्सीविरुद्ध तीन आरोपपत्र दाखल केली आहेत. सीबीआयनेही त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारचे आरोपपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा -
बँकेत घोटाळा करून मोठी गुंतवणूक? पाच आरोपींच्या 168 कोटींच्या मालमत्तेवर पोलिसांकडून जप्ती