सरनाईक-परब-अडसूळांनंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांना 'ईडी'चे समन्स

author img

By

Published : Sep 29, 2021, 11:49 AM IST

Updated : Sep 29, 2021, 12:07 PM IST

ED summons Shiv Sena MP Bhavana Gawli

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यापासून सुरु झालेली ईडी कारवाईची श्रृंखला परिवहन मंत्री अनिल परब, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यानंतर आता यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. खासदार गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडी समोर हजर राहाण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांच्या एका ट्रस्टचे कंपनीत रुपांतर करण्याच्या प्रकरणी हे समन्स बाजवले असण्याची शक्यता आहे. खासदार गवळी यांच्या महिला उत्कर्ष आस्थापनाचे संचालक सईद खान यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. आता खासदार गवळी यांना समन्स बजावण्यात आले आहे.

वाशिम - यवतमाळ येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ४ ऑक्टोबरला त्यांना ईडी समोर हजर राहाण्यास सांगितले आहे.

खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान' या ट्रस्टमध्ये बदल करुन त्याचे 'महिला उत्कर्ष आस्थापना'मध्ये रूपांतर करण्यात आले. या प्रकरणी आस्थापनाचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी 'ईडी'ने चौकशी केली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरच्या रात्री सईद खान यांना अटक करण्यात आली. खान यांना २ ऑक्टोबर पर्यंत कस्टडी देण्यात आली आहे. तर आता खासदार भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावला आहे. खासदार भावना गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडी समोर हजर राहिण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे. त्या या चौकशीसाठी हजर होणार की नाही हे बघावं लागणार आहे.

तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे नेते -

अनिल परब - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कडून दोन वेळा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर अनिल परब हे 28 सप्टेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमैय्या यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

आनंदराव अडसूळ - शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर तब्येत बिघडल्याच्या कारणास्तव आनंदराव अडसूळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आनंदराव अडसूळ हे सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव मानले जाते. मात्र आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरु असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याही अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

प्रताप सरनाईक - प्रताप सरनाईक यांनी एनएसईएलमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली. याबाबत वेळोवेळी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.

रवींद्र वायकर - रविंद्र वायकर यांनी अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमीनींचे करार करण्यात आले होते. जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या सदीनिकांमधून मुंबईतील जवळपास सहा फ्लॅट लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2003 साली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत वरळीमध्ये देण्यात आलेल्या 230 फ्लॅटमधील सहा फ्लॅट किशोरी पेडणेकर यांनी घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर या प्रभागांमध्ये नगरसेविका होत्या. त्यावेळेस हा अपहार झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. तसेच कोविड काळामध्ये महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर उभारण्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे.

यशवंत जाधव आणि यामिनी जाधव - मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी दुबईत असलेल्या 'सिनर्जीत व्हेंचर्स' आणि 'सईद डोन शारजा' या दोन कंपन्या तयार करून त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमैय्या यांनी केला आहे. या कंपनीत पैसा लावण्यासाठी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव यांना पैसे दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकत्त्यामधील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी असल्याचाही आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड उपचारासाठी जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, तसेच इतर बाबतीत जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्या कॉन्टॅक्टमधून केलेल्या काळा बाजारातून हा पैसा उभा करण्यात आला. त्यानंतर या काळ्या पैशाला मनी लॉन्ड्रिंग करून दुबईत गुंतवणूक करण्यात आली आहे. जवळपास पंधरा कोटी रुपये दुबईच्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

मिलिंद नार्वेकर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली समुद्र किनाऱ्याजवळ अनधिकृत बंगला बांधला असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला अनधिकृत बंगला पाडला जाईल, असे आश्‍वासन त्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले होते. तसेच हा बंगला बांधण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी परवानगी घेतली नव्हती, असेही किरीट सोमैय्या यांनी सांगितले होते.

Last Updated :Sep 29, 2021, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.