Karunashram Wardha : वर्ध्यातील करुणाश्रम ठरला प्राणी व पक्षांसाठी हक्काचे घर ; वन्यप्राण्यांना वैद्यकीय सुविधेसह मुक्त संचार

Karunashram Wardha : वर्ध्यातील करुणाश्रम ठरला प्राणी व पक्षांसाठी हक्काचे घर ; वन्यप्राण्यांना वैद्यकीय सुविधेसह मुक्त संचार
वर्ध्यात असलेले करुणाश्रम प्राणी व पक्षांसाठी हक्काचे घर ठरले आहे. करुणाश्रम हे जवळजवळ 2 हेक्टरवर वसलेले आहे. येथे वन्यप्राण्यांना वैद्यकीय सुविधेसह मुक्त संचार करता येतो. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट वाचा.
वर्धा : 1999 मध्ये स्थापन झालेल्या करुणाश्रमात आज अनेक प्राणी पाहायला मिळतात. वर्ध्यातील करुणाश्रम हे प्राण्यांसाठी एक नवीन जीवन जगण्याच्या कल्पनेला वास्तविकतेमध्ये उतरविणारे एक हक्काचे घर ठरत आहे. नुकतेच याठिकाणी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली. या ठिकाणी घेण्यात येत असलेल्या प्राण्यांच्या अभूतपूर्व काळजी व कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. या ठिकाणी असलेले प्राणी हे जंगलातील मुक्त संचारतेचा अनुभव या करुणाश्रमात घेताना पाहायला मिळतात.
एक संपूर्ण परिसंस्था : वर्ध्याच्या सुरुवातीलाच असलेले हे युनीट सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत आहे. सोबतच भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदलाचे केंद्रीय प्राणी कल्याण मंडळ आणी केंद्रीय प्राणी संग्रहणालय प्राधिकरण मंत्रालयाद्वारे नोंदणीकृत आहे. करुणाश्रम हे युनिट दोन स्वतंत्र विभागामध्ये विभागले गेले आहे. एक म्हणजे बचाव केलेल्या प्राण्याला आश्रय देण्यासाठी आणी दुसरा भाग म्हणजे पाळीव प्राण्यांना आश्रय देण्यासाठी आहे. याठिकाणी अनेक देशी वनस्पतींच्या प्रजाती उगवल्या गेल्या आहेत. त्या परिपक्वतेच्या वाजवी टप्प्यापर्यंत वाढल्या आहेत. 30 पेक्षा जास्त प्रजातींच्या पक्षांचे पूर्णपणे नैसर्गिक निवासस्थान असलेल्या परिसरात करुणाश्रम एक संपूर्ण परिसंस्था बनली आहे.
याठिकाणी असलेल्या सुविधा : याठिकाणी जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन थिएटर असून जखमी जनावरांना घेऊन जाण्यासाठी प्रशस्त अशी अॅनिमल अंबुलन्स आहे. इथे जंगली प्राणी ज्यामध्ये बिबट्या, अस्वल, हरीणसारखे असंख्य प्राणी असून खूप सारे विविध पक्षीसुद्धा आहेत. विशेष म्हणजे जंगली प्राण्यांना ठेवण्यासाठी विशेष सुरक्षित सुविधा याठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी आणि सापळे पिंजरे, व बचाव उपकरणे सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व पाळीव प्राण्यांसाठी विशेष निवास व्यवस्था आहे. जनावरांच्या चारा लागवडीसाठी विशेष युनिटसुद्धा आहेत. या करुणाश्रमात वन्य प्राण्यांचे बचाव आणि पुनर्वसन केले जाते. सोबतच त्यांना निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधा प्रदान केल्या जातात. अशी माहिती आशिष गोस्वामी यांनी दिली.
निवासस्थान हे नैसर्गिक सुरक्षित : शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजीत केले जातात. तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्राधान्य इथे दिले जाते. जिल्ह्यात कोणत्याही भागात मग ते जंगल असो किंवा विहीर, शेत असो की घरे याठिकाणी केव्हाही एखाद्या ठिकाणी वन्यप्राण्यांसोबत घटना घडली, किंवा ते संकटात सापडले तर त्यासाठी येथील पथक रूग्णवाहिकेसोबत तात्काळ रवाना होते. त्या प्राण्याला सुखरूप बाहेर काढून त्याच्यावर उपचार करून पुन्हा जंगलात मुक्त संचार करण्यासाठी त्यांना सोडून देते. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले सर्वच प्राणी एकदम मुक्त संचार करतात. त्यांच्यासाठी असलेले निवासस्थान हे पूर्णपणे नैसर्गिक व सुरक्षित करण्यात आल्याने अगदी आनंदात येथे राहतात.
