बहुचर्चित नवी मुंबई मेट्रो अखेर सुरू; कोणत्या भागातील प्रवाशांना होणार फायदा?

बहुचर्चित नवी मुंबई मेट्रो अखेर सुरू; कोणत्या भागातील प्रवाशांना होणार फायदा?
Navi Mumbai Metro : बहुचर्चित बेलापूर ते पेंधर दरम्यान (Belapur to Pendhar Metro Route) असणारी नवी मुंबई मेट्रो अखेर सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीनं या मेट्रोचं उद्घाटन केलं. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता बेलापूर मेट्रो स्थानकावरून पहिली मेट्रो धावली व पेंधर येथून देखील ही मेट्रो दुसऱ्या बाजूनं धावली. या मेट्रोमुळं खारघर व तळोजा नोडमधील प्रवाशांना दिलासा मिळालाय.
नवी मुंबई Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील नागरिकांना तळोजा नोडमध्ये करण्यात येणारा किचकट प्रवास आता मेट्रोच्या माध्यमातून सोपा झालाय. यामध्ये सीबीडी बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक (खारघर), सेक्टर 11, सेक्टर 14, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर 34, पाचनंद, पेधंर ही एकूण 11 स्थानके (Belapur to Pendhar Metro Route) आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनासाठी प्रयत्न : नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते पेंधर दरम्यान असणाऱ्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावं असा गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न केला जात होता. मात्र, गेल्या सहा महिन्यात उद्घाटनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख न मिळाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला शुक्रवारी हे उद्घाटन करून मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळं मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
मेट्रोचा फायदा फक्त खारघर व तळोजा नोडमधील नागरिकांना : नवी मुंबई मेट्रोचा फायदा फक्त तळोजा ते खारघर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. कारण ही मेट्रो फक्त बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणार आहे. त्यामुळे या मेट्रोचा नवी मुंबई व पनवेलमधील नागरिकांना तसा फारसा फायदा होणार नाही. मात्र, नव्याने विकसित झालेल्या तळोजा नोडला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या तळोजा रोडमधील नागरिकांना या मेट्रोमुळं नवी मुंबईशी अगदी सरळ कनेक्टेड राहता येणार आहे. ही मेट्रो सुरू झाल्यामुळं या नोडमधील नागरिक सुखावले आहेत.
