पोलिसांसमोर अनुपस्थितीसाठी वकिलांनी दिले प्रकृती अस्वास्थ्याचे कारण; अन् राणे विमानातून दिल्लीला रवाना!

author img

By

Published : Aug 30, 2021, 1:42 PM IST

Updated : Aug 30, 2021, 2:30 PM IST

पोलिसांसमोर अनुपस्थितीसाठी वकीलांनी दिले प्रकृती अस्वास्थ्याचे कारण; अन् राणे विमानातून दिल्लीला रवाना!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाप्रकरणी महाड पोलिसांसमोर आज हजर व्हायचे होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पोलिसांसमोर हजर राहू शकले नाही असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. तर दुसरीकडे राणे विमानातून दिल्लीला रवाना होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राणेंच्या या प्रवासाविषयी आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.

सिंधुदुर्ग : कोकणातील जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास राणे कणकवलीहून गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. तिथून ते दिल्लीला निघतील. दरम्यान, नारायण राणे यांना आज महाड गुन्हे शाखेसमोर हजर व्हायचे होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते महाड पोलिसांसमोर हजर होऊ शकले नाही असे स्पष्टीकरण राणेंच्या वकिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन दिले. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यानंतर पोलिसांसमोर हजर राहू न शकलेले राणे विमान प्रवास कसा करू शकतात असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

पोलिसांसमोर अनुपस्थितीसाठी वकीलांनी दिले प्रकृती अस्वास्थ्याचे कारण

प्रकृती अस्वास्थ्यामुळे राणे अनुपस्थित

राणेंचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, राणेंना न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार राणेंना सोमवारी दुपारी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान महाड गुन्हे शाखेसमोर हजर राहणे अनिवार्य होते. मात्र, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राणेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना महाडला येणे शक्य नव्हते. त्यासंदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र आम्ही पोलिसांना सादर करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे ते आज पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत असे राणेंच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले.

...तरीही राणे दिल्लीला रवाना

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे सकाळी साडेअकराच्या सुमारास कणकवलीहुन गोवा विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. तिथून आज दुपारी ते दिल्ली येथे त्यांच्या मंत्रालयात जाणार आहेत. त्यामुळे राणेंच्या या प्रवासाविषयी आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.

राणेंच्या अटकेनंतरही जन आशीर्वाद यात्रा पूर्ण

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात १९ ऑगस्टपासून मुंबईतून झाली होती. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे जनतेशी संवाद साधत राणे आणि भाजपचे प्रमुख नेते रत्नागिरीत दाखल झाले होते. यानंतर पत्रकार परिषदेतील वादग्रस्त विधानावरून नारायण राणे यांच्यावर राज्य शासनाने अटकेची कारवाई केली होती. यानंतर राणेची जन आशीर्वाद यात्रा देशभरात गाजली होती. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जन आशीर्वाद यात्रेवर याचा काय परिणाम होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, राणेंच्या अटकेच्या कारवाईनंतरही भाजपने जन आशीर्वाद यात्रा पूर्ण केली.

सिंधुदुर्गात शिवसेनेला डिवचण्याचा फारसा प्रयत्न नाही
सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ठिक-ठिकाणी जंगी स्वागत झाले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. मात्र यावेळी राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला डिवचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. मात्र, यात्रेच्या समारोपाच्या दिवशी पत्रकार परिषदेतून त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवरही टीका केली. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शेवटच्या टप्प्यात वेंगुर्ला दोडामार्ग या परिसरात होती. त्यानंतर कणकवलीत विश्रांती घेऊन राणे आज आपला दौरा संपवून दिल्लीला रवाना झालेत.

गुन्हे शाखेसमोर हजर राहणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांना महाड गुन्हे शाखेसमोर हजर होणे गरजेचे होते. मात्र नारायण राणे यांच्या प्रकृतीसंदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र गुन्हे शाखेमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे नारायण राणे त्या ठिकाणी हजेरीला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - नारायण राणेंना पक्षाकडून आले तातडीचे बोलावणे, गोव्यातून दिल्लीसाठी रवाना

Last Updated :Aug 30, 2021, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.