चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या - आमदार नितेश राणे

author img

By

Published : Dec 20, 2020, 11:52 PM IST

mla Nitesh Rane demands to give name of balasaheb thakrey for chipi airport

चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आमदार राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आमदार राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश एअर इंडियाचे अध्यक्ष तथा सिव्हिल एविएशनचे सेक्रेटरी प्रदिप सिह खरोला यांनी आयआरबी कंपनीला दिले आहेत. याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विमानतळ सुरू करण्याबाबत आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी केलेले ट्विट महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडणारे आहे.

आमदार नितेश राणे यांचे हे ट्विट शिवसेनेला कोंडीत पकडणारे
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नेतृत करत आहेत. चिपी हे तळकोकणातील विमानतळ सुरू करण्यासाठी शिवसेना उत्सुक आहे. यावेळी या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी करून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

ट्विटमध्ये आमदार राणे काय म्हणतात
आपल्या या ट्विटमध्ये आमदार नितेश राणे म्हणतात, सन्माननीय नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला "दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

mla Nitesh Rane demands to give name of balasaheb thakrey for chipi airport
आमदार नितेश राणे यांनी केलेले ट्विट
26 जानेवारीपूर्वी कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश
नागरी उड्डाण मंत्रालयाने नागरी उडाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आणि विमानतळ परवाना धारकास (आयआरबी कंपनी) विमानतळ परवान्यासह सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अलायन्स एअर विमान कंपनीने विमानाचे वेळापत्रक निश्चित करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता 26 जानेवारी 2021 ला चिपी विमानतळ सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.