अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार

author img

By

Published : Sep 27, 2021, 4:21 PM IST

Updated : Sep 27, 2021, 4:45 PM IST

Worship of a minor girl

वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे.

सातारा - वाई तालुक्यातील सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ -

घटनास्थळी वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना 'तिला त्रास होत होता म्हणून हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत' असं एका महिलेने सांगितले. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.

वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार
भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल -
अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे चर्चेला उधाण आले आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.


हे ही वाचा - Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप

अंनिसची मागणी -

अल्पवयीन मुलीला 'बाहेरची बाधा' झाली असे समजून अघोरी पूजा घालण्यास भाग पाडणाऱ्या मांत्रिकाचा त्वरित शोध पोलिसांनी घ्यावा. संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातारा जिल्हा अंनिसच्या वतीने प्रशांत पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

यापूर्वी पोलिसांनी केला होता हस्तक्षेप -

मांढरदेव (ता वाई) येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक दावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. सुरूर (ता. वाई) या गावातील धावजी पाटील या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर पूजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या मंदिर परिसरातील बाहेरून येणाऱ्या पूजाऱ्यांचे तंत्र-मंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. सुरूर (ता. वाई) येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे. तिथेच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

Last Updated :Sep 27, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.