शेळ्या चारल्याच्या कारणातून हत्या: साताऱ्यातील तीन भावांना जन्मठेप

author img

By

Published : Oct 1, 2021, 12:10 PM IST

शेळ्या चारल्याच्या कारणातून हत्या: साताऱ्यातील तीन भावांना जन्मठेप

जिल्ह्यातील बोरखेळमध्ये जून 2016 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी तीन सख्ख्या भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रानात शेळ्या चारल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली होती.

सातारा : जिल्ह्यातील बोरखेळमध्ये जून 2016 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी तीन सख्ख्या भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रानात शेळ्या चारल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली होती.

सख्ख्या भावांना जन्मठेप

रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघेही रा.बोरखळ) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय 40, रा.बोरखळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारायण पाटील (वय 48) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

शेळ्या चारल्याच्या कारणातून हत्या
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे 28 जून 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता बोरखळमधील कोळकीचा माथा येथे शेळ्या चारत होते. त्या शेळ्या संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात गेल्या. या कारणातून पाटील व रसाळ यांच्यात वाद झाला. त्यातून संशयितांनी हत्यारांसह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले व जागीच त्यांचा मृत्यू झाला.

गुन्ह्यात दोषसिद्धी
या गुन्ह्याचा तपास सपोनि सुनील जाधव यांनी करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिन्ही भावांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी मानले. तिघांनाही जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार शुभांगी भोसले, पूर्णा यादव, घाडगे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा - नागपूर: भरवस्तीत मारहाण करणाऱ्या गुंडाची दोन आरोपींकडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.