उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह जमावावर दरोड्याचा गुन्हा

author img

By

Published : Sep 10, 2021, 2:21 AM IST

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. शहर पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समर्थक नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे यांच्यासह १५ ते १६ जणांवर दरोडा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा - भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. शहर पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समर्थक नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे यांच्यासह १५ ते १६ जणांवर दरोडा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

गाडी लावण्यावरून झाला वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले यांचे चिरंजीव सनी भोसले हे त्यांच्या मित्रांसह काल कास पठारावर गेले होते. तिथून परत आल्यावर ते पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात थांबले होते. या वेळी गाडी लावण्यावरून एकाबरोबर वाद झाला. त्या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यावेळी सशस्त्र हल्ला झाल्याने सनी भोसले व त्याच्या साथीदारांसह पाचजण जखमी झाले. जखमींनी दाखल केलेल्या रुग्णालयाबाहेर गर्दी जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरोडा, खुनाचा प्रयत्न

रात्री उशीरा या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलैश बडेकर, निखील किर्तीकर व त्यांचे अन्य साथीदार अशा एकूण १५ ते १६ जणांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयीतांनी कोयता, गुप्ती, रॉडने हल्ला केल्याबरोबरच पिस्तूलाचा धाक दाखवल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे. याबाबत सनी मुरलीधर भोसले याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो उदयनराजे समर्थक माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले यांचा मुलगा आहे. काही वर्षापूर्वीही या गटामध्ये मारामारी झाली होती. तेंव्हाही बाळू खंदारे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.