पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून शिवीगाळ करणार्‍या मेव्हुण्याची दाजीकडून हत्या

author img

By

Published : Sep 10, 2022, 7:01 PM IST

पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून शिवीगाळ करणार्‍या मेव्हुण्याची दाजीकडून हत्या

सातारा जिल्ह्यात पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करणार्‍या मेव्हुण्याची दाजीने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील उंडाळे येथे अनंत चतुर्दशीदिवशी रात्रीच्यावेळी ही घटना घडली. यानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी फरारी झालेल्या अवधूत हणमंत मंडले या संशयितास अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले.

सातारा - पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करणार्‍या मेव्हुण्याची दाजीने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातार्‍यातील उंडाळे (ता. कराड) येथे अनंत चतुर्थीदिवशी रात्रीच्या 11 च्या सुमारास ही घटना घडली. कराड ग्रामीण पोलिसांनी फरारी झालेल्या अवधूत हणमंत मंडले (रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) या संशयितास अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले. सचिन वसंत मंडले (वय 35, मूळ रा. रेठरे खुर्द, ता. कराड), असे हत्या झालेल्याचे नाव आहे.

नवरा मारहाण केल्याने पत्नी होती माहेरी - रेठरे खुर्द (ता. कराड) येथील मळूचा रहिवासी असणारा सचिन मंडले हा दूध व्यवसायाच्या निमित्ताने उंडाळे (ता. कराड) येथे भाड्याच्या घरात राहत होता. तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे पत्नी माहेरी रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे राहत होती. माहेरचे लोक तिला नांदायला पाठवत नव्हते. या कारणावरून सचिन मंडले याने फोनवरून मेव्हुण्यास शिवीगाळ केली होती. दरम्यान, अवधूत हा शुक्रवारी (दि. 9) उंडाळे येथे दाजीकडे आला होता. सगळ्यांनी एकत्रित जेवण केल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास अवधूत याने सचिन मंडले याची धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.

उपचारापूर्वीच झाला मृत्यू - धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या सचिन यास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. मात्र, संशयीत फरारी झाला होता. त्याला पोलिसांनी अडीच तासात जेरबंद केले. पोलिसांनी त्याला शनिवारी कराडच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.