अचानक काय झाले? एकाच वेळी सहा गवा रेड्यांचे संशयास्पद मृत्यू

author img

By

Published : Feb 21, 2023, 8:46 AM IST

रानरेडा

एकाच वेळी संशयास्पदरित्या पाच गवे मृत अवस्थेमध्ये सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रिळे या ठिकाणी आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकूण सहा गवे रेडे मृत्युमुखी पडले आहेत. वन विभागाकडून या गव्यांचे शविच्छेदन करून दहन करण्यात आले आहे. प्राथमिक तपासामध्ये विषबाधा होऊन गवांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सांगली : शिराळा तालुक्यातील रिळे येथील पाटील दरा हद्दीत पाच गवे संशयास्पदरित्या मृत अवस्थेत आढळून आले आहेत.विषबाधा झाल्याने गव्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सदर गव्यांचे शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी दहन करण्यात आले.दोन दिवसात सहा गवे मृत आढळून आले.रविवार दि.१९ रोजी पावलेवाडी खिंडी दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी वयोवृद्ध होऊन मयत झालेला गवा आढळुन आला होता.

याबाबत घटनास्थळावरून व वन्यविभाग कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.१९ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभाग सर्वे नंबर २३४ च्या लगत मालकी क्षेत्रामध्ये काही ठरावीक अंतरावर एकुण ३ गवे यामध्ये २ नर तर १ मादी जातीचे अंदाजे ४ ते ६ वयाचे गवे संशयास्पदरित्या मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख,वनपाल सुरेश चरापले, बिऊर येथील वनरक्षक हणमंत पाटील, बिळाशी येथील वनरक्षक प्रकाश पाटील, बावची येथील वनरक्षक अमोल साठे यांच्या सह कर्मचार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.शोधाशोध केली असता सदर ठिकाणी एकुण ५ गवा वन्यप्राणी संशयीतरित्या मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी मृत ५ गव्यापैकी २ गव्यांचे मृतदेह पुर्ण पणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करुन अहवाल तयार करणेत आला.

दहन करुन विल्हेवाट इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शिराळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी शुभांगी अरगडे यांनी शवविच्छेदन कले. यावेळी सदर गव्यांचा मृत्यू विषबाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. घटनास्थळी उप वनसंरक्षक (प्रा.) सांगली निता कट्टे, सहा.वनसंरक्षक (वनीकरण) सांगली डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल फिरते पथक महंतेश बगले , मानद वन्यजीव रक्षक सांगली अजितकुमार पाटील यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली व तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी रिळे गावाचे सरपंच बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृत तिन्ही गव्यांचे दहन करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात‌ आली.

गावा-गावात गव्या रेड्यांची मोठी दहशत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य येथून जवळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्या रेडयांचा वास्तव आहे.अनेक वेळा एकटे आणि कळपाने गवे रेडे बाहेर पडून शेताचे नुकसान करत आसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक वेळा थेट सांगली शहरापर्यंत देखील गव्या रेड्याने मजल मारली. यामुळे गावा-गावात गव्या रेड्यांची मोठी दहशत आहे.चांदोली अभयारण्याच्या जवळ असणाऱ्या गावासह शिराळा तालुक्यात गव्यांचा मुक्त वावर अनेक वेळा पाहायला मिळतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.