MPSC Exam Topper: सांगलीचा प्रमोद चौगुले एमपीएससी परीक्षेत पुन्हा एकदा टॉपर; राज्यात पहिला येण्याचा दुसऱ्यांदा बहुमान

author img

By

Published : Mar 1, 2023, 7:11 AM IST

MPSC Exam Topper

राज्यसेवा 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले हे राज्यात पहिले आले आहेत. सलग दुसऱ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान चौगुले यांनी मिळवला आहे. प्रमोद चौगुले सध्या उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत आहे. नाशिक येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांच्या या दुहेरी यशामुळे चौगुले त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया देताना एमपीएससी टॉपर प्रमोद चौगुले

सांगली : 2019 मध्ये पहिल्यांदा प्रमोद यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र अधिकारी होण्याची संधी हुकली होती. त्यानंतर 2020 ला प्रमोद चौगुले यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यात राज्यात पहिले आले होते. त्यानंतर त्यांची नाशिक येथे उद्योग विभागात उपसंचालक म्हणून निवड झाली होती. नाशिक येथे ट्रेनिंग सुरू होते. 2021 मध्ये पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. ज्यामध्ये प्रमोद चौगुले हे पुन्हा राज्यात प्रथम आले आहेत. 633 इतके गुण त्यांना मिळाले आहेत. 2020 मध्ये त्यांना 612.50 इतके गुण मिळाले होते, पण दुसऱ्यांदा त्यांनी 11 गुण ज्यादा मिळवत राज्यात पहिला येण्याची बहुमान मिळवला आहे.


पोलीस विभागामध्ये जाण्याची पहिल्यापासून इच्छा : प्रमोद चौगुले यांना पोलीस विभागामध्ये जाण्याची पहिल्यापासून इच्छा होती. मात्र 2020 मध्ये एमपीएसमध्ये त्या जागा नव्हत्या, पण ते त्यावेळी प्रथम आले होते. त्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्र निवडले होते. पण पोलीस उपअधीक्षक बनण्याचे त्यांची इच्छा प्रबळ होती. यामुळे प्रमोद चौगुले यांनी पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. ज्यामध्ये ते आता प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना राज्यात पहिला येण्याचा दुसऱ्यांदा बहुमान मिळवले आहे.


आई-वडिलांचे ध्येय : मिरज तालुक्यातील सोनी हे प्रमोद चौगुले यांचे मूळ गाव आहे. पण गेल्या सात वर्षांपासून कामाच्या निमित्ताने चौगुले कुटुंब सांगलीत स्थायिक आहे. प्रमोद चौगुले यांचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिर आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण कराड व सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून झाले. आई-वडिलांचे ध्येय एकच होते, मुलांनी शिक्षण घ्यावे. प्रमोद चौगुले यांच्या आई-वडिलांनी कधी ही त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. वडील टेम्पो चालक आणि आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. प्रमोद यांचे आता सर्व कुटुंब एकत्रित सांगलीत राहते. पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय आणि आजी, असा त्यांचा परिवार आहे.


यशाचे श्रेय कुटुंबाला : सलग दुसऱ्यांदा राज्यसेवा आयोग परीक्षेत राज्यात बाजी मारणारे प्रमोद चौगुले, हे सर्व यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला देतात. याबाबत चौगुले म्हणाले, सलग दुसऱ्यांदा आपण राज्यात प्रथम आलो. याबद्दल खूप आनंद होत आहे. तो शब्दात सांगणे देखील अवघड आहे. 2015 ला आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, पण त्यात अपयश आले. त्यामुळे आपण एमपीएससीकडे वळलो. ज्यावेळी आपण पहिल्यांदा एमपीएस परीक्षेत पास झालो. त्याच्या आधी अभ्यास करताना महापूर आणि त्यापाठोपाठ कोरोनाचे संकट आले. कोरोना काळात घरातील सर्वजण पॉझिटिव्ह आले होते. खूप मोठे टेंशन होते, पण यातून आपण जिद्द सोडले नाही. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा देत असताना प्रचंड कष्ट पाहिजे, घराच्यांचा सपोर्ट पाहिजे, तरच अभ्यास शांत पणे करू शकतो. यश मिळवू शकतो. तसेच अभ्यास करताना सातत्य पाहिजे, याशिवाय आपण कोणत्या परिस्थितीमधून आलो आहोत, याचे भान ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते.



चौगुले पॅटर्न तयार केला : मुळात आपल्याला पोलीस उपअधीक्षक बनायचे होते. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होता. उद्योग विभागाच्या उपसंचालक म्हणून नियुक्ती होऊन,प्रशिक्षण सुरू असताना, आपण त्यासाठी मन लावून अभ्यास करत होतो. यामध्ये पत्नी, आई-वडील आणि भाऊ यांची साथ महत्वाची मिळाली. ज्यातून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकलो. प्रमोद चौगुले यांच्या पत्नी प्रेरणा यांचा भाऊ प्रवीण चौगुले हे उपजिल्हाधिकारी आहेत. प्रमोद त्यांचे मेव्हणे या दोघांनी 2019 मध्ये एकत्रित एमपीएससी परीक्षा दिली होती. मात्र ज्यामध्ये प्रविण चौगुले हे राज्यात प्रथम आले होते. त्यानंतर प्रमोद चौगुले यांनी 2020 आणि 2021 च्या राज्यसेवा आयोग परीक्षेत पहिला येण्याची बहुमान मिळवत चौगुले पॅटर्न तयार केला आहे.




हेही वाचा : MPSC Result Announced : एमपीएससीचा निकाल जाहीर; राज्यात प्रमोद चौघुले प्रथम तर शुभम पाटील याने पटकावला दुसरा क्रमांक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.