VIDEO : सांगलीतील लोखंडी खुर्च्यांचा गजब प्रवास, थेट गाठले इंग्लंड..!

author img

By

Published : Sep 26, 2021, 7:40 PM IST

Sangli chairs found in England

इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये सापडलेल्या खुर्च्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. तासगावच्या सावळज येथील बाळू लोखंडे या मंडपवाल्याच्या या खुर्च्या मॅन्चेस्टरमधील एका हॉटेलबाहेर अगदी थाटात बसण्यासाठी वापरल्या जात आहेत.

सांगली - इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये सापडलेल्या खुर्च्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. तासगावच्या सावळज येथील बाळू लोखंडे या मंडपवाल्याच्या या खुर्च्या मॅन्चेस्टरमधील एका हॉटेलबाहेर अगदी थाटात बसण्यासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, खुर्च्या तिथे पोहोचल्या कशा? याबाबतही आता कुतूहल निर्माण झाले आहे.

माहिती देताना व्यावसायिक बाळू लोखंडे

हेही वाचा - सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड

इंग्लंडमध्ये थेट सांगलीच्या खुर्च्या

इंग्लंडमधील मॅन्चेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर काही लोखंडी खुर्च्या क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांना आढळून आल्या. या लोखंडी खुर्च्यांवर 'बाळू लोखंडे, सावळज'असे लिहले आहे. त्यामुळे, लेले यांना चकचकीत हॉटेल बाहेर आपल्या भारतातल्या आणि तेही महाराष्ट्रातील खुर्च्या कश्या पोहोचल्या ? या बद्दल आश्चर्य वाटले आणि याबद्दल लेले यांनी एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नेटकरामध्ये या खुर्च्यांबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली. मग त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांवर तुफान व्हायरल केला. भारतातल्या लोखंडी खुर्च्या, जुन्या ते सोने, दुर्मिळ म्हणून बसण्यासाठी परदेशी नागरिक या खुर्च्या वापरत आहेत, अशा अनेक पद्धतीचे कमेंट्स केल्या.

बाळू लोखंडे म्हणतात आश्चर्यम

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे या मंडप डेकोरेशन करणाऱ्या व्यक्तीच्या असणाऱ्या या खुर्च्या थेट लंडनमध्ये कशा पोहोचल्या? याबाबत अनेक तर्कवितर्क आणि आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत बाळू लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. खुर्च्या लंडनमध्ये कश्या पोहोचल्या याची बाळू लोखंडे यांनाही कल्पना नाही.

15 वर्षांपूर्वी घातल्या भंगारात

याबाबत बाळू लोखंडे म्हणाले, आपला मंडप डेकोरेशनचा खूप जुना व्यवसाय आहे. ज्या खुर्च्या आता इंग्लंडमध्ये आहेत, त्या आपण पंधरा वर्षांपूर्वीच भंगारामध्ये घातल्या होत्या. जवळपास पंधरा किलो वजनाची एक खुर्ची आहे. व्यवसायामध्ये पुढे जाताना आपण त्या खुर्च्यांची विक्री करून नव्या प्लास्टिक खुर्च्या घेतल्या. मात्र, त्यावेळी या खुर्च्यांचे काय होईल, हे आपल्याला माहिती नव्हते, मात्र आता या खुर्च्या इंग्लंडमध्ये पाहून आपल्याला देखील खूप समाधान झाले आहे.

सुनंदन लेले यांच्यामुळे या खुर्च्या आपल्याला पाहायला मिळाल्या. लेले यांनी देखील आपल्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून याबाबत माहिती घेतली व आनंद व्यक्त केला. आपल्याला देखील जुन्या व्यवसायाची आठवण झाली, अशी भावना बाळू लोखंडे यांनी व्यक्त केली.

चकचकीत हॉटेलेची वाढत आहे शान

बाळू लोखंडे यांनी 15 वर्षांपूर्वी या लोखंडी खुर्च्या भंगारामध्ये विक्री केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडमध्ये एका व्यावसायिकाने त्या खुर्च्या खरेदी केल्या, तेथून मॅन्चेस्टरमधील एका हॉटेल चालकाने 15 खुर्च्या विकत घेतल्या, आज मॅन्चेस्टर मधल्या एका कॅफेच्या बाहेर 'अँटिक पीस'म्हणून बसण्यासाठी तिथल्या ग्राहकांना सावळजच्या बाळू लोखंडे यांच्या लोखंडी खुर्च्या आकर्षित करत आहेत.

भंगार नव्हे अँटिक पीस

खर तर भारतामध्ये आज पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचे अनुकरण केले जाते, मात्र भारतातल्या जुन्या गोष्टी, त्याचा अगदी उत्कृष्ट पद्धतीने वापर परदेशात केला जातो, हे इंग्लंडच्या मॅन्चेस्टर मधल्या एका हॉटेलबाहेर सापडलेल्या बाळू लोखंडे यांच्या लोखंडी खुर्चीमुळे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - कन्या दिन विशेष : शिक्षणासाठी आईला तुंरुगवास, स्वत: भाजीपाला विक्री करत राधिका झाली नेव्हल ऑफिसर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.