Protest Against LPG Price Hike : गॅस सिलेंडरवर दरवाढीविरोधात आंदोलन; सांगलीत अनोख्या पद्धतीने निषेध, वाचा सविस्तर

author img

By

Published : Mar 9, 2023, 2:59 PM IST

Protest Against LPG Price Hike

गॅस दरवाढी विरोधात थेट सांगलीमध्ये स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आले आहे. गॅस दरवाढीचा निषेध म्हणून चक्क प्रतीकात्मक सिलेंडरचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

गॅस सिलेंडरवर दरवाढीविरोधात आंदोलन

सांगली : शहरातील अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी गॅसच्या प्रतीकात्मक गॅस सिलेंडरचे अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराप्रमाणे या ठिकाणी चिता रचून विधी पार पाडत प्रतिकात्मक गॅस सिलेंडरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात बोंब मारून निषेध देखील व्यक्त केला आहे.

दरवाढीचा फटका : केंद्र सरकारच्या वतीने नुकताच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आणि या दरवाढीमुळे देशभरात दरवाढी विरोधात आगडोंब उठला आहे. अनेक ठिकाणी गॅस दरवाढीचे आंदोलन होत आहेत. या गॅस दरवाढीचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना बसला आहे. एका बाजूला महागाई त्यामध्ये जीवनावश्यक बनलेल्या गॅसच्या दरामध्येही वारंवार वाढ होत असल्याने गृहिणींचा किचनचे बजेट कोलमडत असल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात आता सर्वसामान्य नागरिक विविध सामाजिक संघटना पक्ष आणि विरोधक गॅस दरवाढीचा वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. कुठे चुलीवर स्वयंपाक करून तर कुठे गॅस सिलेंडरला श्रद्धांजली अर्पण करत गॅस दरवाढीत विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आहेत.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा : सांगली शहरातल्या मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने गॅस दरवाढीचा गुरुवारी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. मदन भाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली थेट स्मशानभूमीमध्ये गॅस दरवाढीचा आंदोलन करण्यात आले आहे. शहरातल्या अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या चिते प्रमाणे गॅस सिलेंडरसाठी लाकडी चिता रचण्यात आली. यासोबत विधीवत पद्धतीने या ठिकाणी अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच यावेळी अगदी खराखुरा नैवेद्य देखील चितेले आत्मशांती मिळावा म्हणून ठेवण्यात आला होता. यावेळी या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह मदनभाऊ पाटील युवा मंचचे पदाधिकारी आणि महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अनोख्या पद्धतीने निषेध : आंदोलनाबाबत आनंद लेंगरे म्हणाले की, केंद्र सरकारकडून गॅसच्या दरवाढी करण्यात आली आहे. त्यामुळे या दरवाढीला कंटाळून एका सिलेंडरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आणि त्याच्यावर आता आम्ही अंत्यसंस्कार केला आहे. आता अस्थी विसर्जन देखील करणार आहोत, असे विडंबनात्मक मत लेंगरे यांनी व्यक्त केले. तसेच केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मोदी सरकारकडून अच्छे दिन, दोन कोटींचे रोजगार, महागाई कमी होईल, अशा मोठ-मोठया घोषणा करण्यात आल्या. मोदी सरकारकडून जी आश्वासन सामान्यांना देण्यात आली होती तिची कुठेच पूर्तता झालेली नाही, आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही गॅस सिलेंडरच्या प्रतीकात्मक पोस्टरवर अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Best Employee : मुलाच्या आजारपणात सुटी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बेस्टचा नारळ, न्यायालयाने दिले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.