गृहमंत्री झाल्यावर बीपी-शुगरचा त्रास हमखास सुरू होतो - मंत्री जयंत पाटील

author img

By

Published : Oct 19, 2021, 3:28 PM IST

मंत्री जयंत पाटील

गृहमंत्री झाल्यावर ब्लड प्रेशर (रक्तदाब) आणि शुगरचा (मधुमेह) त्रास सुरू होतो, हे आर आबांनी आधीच सांगितले होते. गृहमंत्री झाल्यावर आपल्याला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, पण मधुमेह मागे लागू नये, ही भूमिका आपण त्यानंतर घेतल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सांगली - गृहमंत्री झाल्यावर ब्लड प्रेशर (रक्तदाब) आणि शुगरचा (मधुमेह) त्रास सुरू होतो, हे आर आबांनी आधीच सांगितले होते. गृहमंत्री झाल्यावर आपल्याला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला, पण मधुमेह मागे लागू नये, ही भूमिका आपण त्यानंतर घेतल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्र्यांना इतका तणाव असतो तर विचार करा पोलिसांना किती तणाव असेल, असे म्हणत त्यांनी पोलिसांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले. सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

बोलताना मंत्री जयंत पाटील

नुतून इमारत भूमिपूजन सोहळा

सांगली पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय याठिकाणी नूतन पोलीस अधीक्षक इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुमन आर. पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे

यावेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे आहे. आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर गोंधळ घालणारे लांबच रहातात, पोलिसांची चौकशी होते. पण, आपण पोलिसांना जेवढे संरक्षण देऊ, तेवढे अधिक धाडसाने पोलीस रस्त्यावर उतरतील. अनेक वेळा राज्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीने पहिल्यांदा पोलिसाला बदला, अशी भूमिका घेतात. पण, बदलने हा उपाय नसतो, खरंच जर त्याची चूक असेल त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे.

गृहमंत्री झाल्यावर रक्तदाब, मधुमेह हमखास

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री झाल्यावर माझे रक्तदाब वाढल्याचे सांगितले. खरंतर 2009 मध्ये आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी दिली होती. पण गृहखाते घेण्यापूर्वी एका कार्यात आबा व मी, असे आम्ही दोघे होतो. गृहखाते कसे असते.?, असे त्यांना विचारले. त्यावेळी आबांनी मला विचारले की, तुम्हाला रक्तदाब किंवा मधुमेह आहे का..? मी अजिबात नाही म्हणून सांगितले. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील. गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. आपल्या खासगी सचिवाला रक्तदाब व मधुमेह दोन्ही सुरू झाले. इतके तणावपूर्ण काम असते. त्यामुळे तेव्हापासून मत आहे, की ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, आता शुगर मागे लावून घ्यायची नाही. पण, मत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलीस किती तणावाखाली जगत असतील, या चा विचार केला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर पोलिसांच्या सदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा आराम देण्यासह, त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.