Chandrahar Patil On Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होतो- पैलवान चंद्रहार पाटील

author img

By

Published : Jan 24, 2023, 4:31 PM IST

Chandrahar Patil opinion in Sangli

कुस्ती क्षेत्रातील लोकांच्याकडून पैलवानांवर अन्याय सुरू आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांच्यावर अन्याय होत आला आहे, असा आरोप डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज (मंगळवारी) केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद हे कायमस्वरूपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा' भरवण्याचा आपला मानस असल्याचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.

पैलवान चंद्रहार पाटील पैलवानांच्या व्यथा मांडताना

सांगली: महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या तर त्या विनातक्रार आणि वादाविना होऊ शकतात. कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवून देऊ त्यानंतर कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरू होईल, असा विश्वास देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच पैलवानावर आज अन्याय झाल्यास तो आत्महत्येपर्यंत जातो आणि मी देखील महराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. मात्र, त्यातून सावरलो आहे. पण, ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना माझे सांगणे आहे की, कोणत्याही पैलवानावर आता अन्याय करू नका, असा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पैलवान चंद्रहार पाटील बोलत होते.


अन्याय थांबविण्यासाठी प्रयत्न करणार : यावेळी पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले, देशातील अद्यावत असे पाहिले 'राष्ट्रकुल कुस्ती संकुल'विटा याठिकाणी 3 एकर क्षेत्रात उभारण्यात येत आहे. याठिकाणी मॅट, मातीच्या मैदानाबरोबर जॉगिंग ट्रॅक, स्वीमिंग पूल, हॉस्पिटल, लायब्ररीपासून 500 मल्ल राहण्यापर्यंत सर्व सुविधा आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे कुस्ती संकुल उभारण्यात येत असून त्याचे 70 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहेत. या तालमीत सध्या 50 मुले सराव करत असून इतर काम सुरू आहेत. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या कुस्ती निर्माण झालेला वाद आणि आरोप आता कुस्ती क्षेत्रातील पैलवान यांच्यावर अन्याय हा होतच आलेला आहे. माझ्यावर देखील हा अन्याय झाला होता. त्यामुळे मी गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी देखील गेलेलो नाही. पण, कुस्ती क्षेत्रातला हा पैलवानांवरचा अन्याय कुठेतरी थांबावा म्हणून चंद्रहार पाटील विथ फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

पराभव पचवत स्वत:ला सावरले : यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान 'चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन'च्या माध्यमातून सांगली जिल्ह्याला मिळवून ही स्पर्धा विना वादविवाद यशस्वी करुन विजेत्या मल्लास 1 कोटी रुपये चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन तर्फे देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ही स्पर्धा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करु. स्पर्धेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपविजेत्या मल्लास आणि इतर वजनी गटातील विजेत्यास किती बक्षीस असेल ते स्पष्ट करण्यात येईल. त्यामुळे या स्पर्धेच्या यशानंतर नक्कीच यापुढे 'सांगली पॅटर्न' प्रमाणे तमाम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येईल असे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

निकाल दुसऱ्या दिवशी : 2003 साली यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझी व प्रतिस्पर्धी मल्लाची कुस्ती घेऊन निकाल दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी मल्लाच्या बाजूने देण्यात आला. कुस्तीच्या इतिहासात निकाल दुसऱ्या दिवशी देण्याची घटना यापूर्वी व यानंतर कधीच घडली नाही. त्यानंतर 2009 'पुणे महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत 6 मिनिटाच्या कुस्तीला दीड तास लावला गेला. ज्यात मला हरवण्यासाठी बराच वादविवाद केला गेला. ज्यामध्ये मी डाव केला तरी गुण प्रतिस्पर्धी मल्लास देण्यात आले. यास्पर्धेत मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा गदा सलग तिसऱ्यांदा आणून देण्यासाठी उतरलो होतो आणि महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात एकमेव मी असा पैलवान होतो, ज्याने तीन वेळा लढण्याचा पराक्रम घडवला. मात्र, मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये, यासाठी माझ्यावर अन्याय करवत मला हरवले गेले. तरीही मी खचून न जाता पुढे 7 वर्षे विविध दुखापती व पराभव पचवत महाराष्ट्र केसरीसाठी लढत होतो. मात्र मला यश आले नाही.


म्हणून कुस्तीही पहायला गेलो नाही : आता भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही यासाठी मी 'चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशमन'च्या माध्यमातून कार्य करणार आहे. अन्याय झाल्यानंतर संबंधित कुस्तीगीराना काय वेदना होतात हे माझ्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी आजवर एकही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पहायला गेलो नाही. कुस्तीवर अन्याय काय असतो व त्याचे परिणाम काय होतात याची मला जाणीव असल्याने, असा अन्याय होऊ न देण्याचा मी 'चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन'च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Rahul Gandhi On Surgical Strike: सर्जिकल स्ट्राईकबाबत दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी सहमत नाही: राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.