विशेष : वातावरणातील अचूक अंदाजासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात उभारले हवामान केंद्र

author img

By

Published : Sep 29, 2021, 10:26 PM IST

Updated : Sep 29, 2021, 10:58 PM IST

Farmer set up weather station in their own farm sangli

वास्तविक सांगली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळा आहे. यामध्ये जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाण्याची असणारी टंचाई, त्यात होणारी गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला येथील शेतकऱ्यांना सामोरे जावं लागते. परिणामी हवामानाचा मोठा फटका उत्पादनावर होतो. या सर्व अडचणी सचिन संख यांना देखील सातत्याने येत होत्या.

सांगली - शेतीला बदलत्या हवामानानुसार संरक्षित करण्यासाठी दुष्काळी जत मधील एका प्रगतशील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात हवामान केंद्र उभारले आहे. सचिन संख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे हवामानावर आधारित असणाऱ्या शेतीचे आता सचिन संख हवामान केंद्राच्या माध्यमातून नियोजन करत आहेत. शिवाय त्यांच्या या हवामान केंद्राचा आसपासच्या शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे.

ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

शेतात उभारले स्वतःचे हवामान केंद्र -

भारतीय शेती आजही हवामानावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानामुळे आज शेतीला मोठ्या नुकसानालाही सामोरे जावे लागत आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुष्काळी भागातील प्रगतशील शेतकरी सचिन संख या तरुणाने आपल्या शेतात स्वतःचा हवामान केंद्र उभारून शेतीला नवा दिशा दिली आहे. जतमधून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या सचिन संख यांची सुमारे 45 एकर शेती आहे. ज्यामध्ये ते प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळींब फळपिकांचे उत्पादन घेतात. निर्यातक्षम उत्पादन घेण्याकडे त्यांचा अधिक कल आहे.

पारंपरिक शेतीला आधुनिकेतची जोड -

वास्तविक सांगली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळा आहे. यामध्ये जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाण्याची असणारी टंचाई, त्यात होणारी गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला येथील शेतकऱ्यांना सामोरे जावं लागते. परिणामी हवामानाचा मोठा फटका उत्पादनावर होतो. या सर्व अडचणी सचिन संख यांना देखील सातत्याने येत होत्या. त्यामुळे त्यांना द्राक्षे आणि डाळींबांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत असताना बदलते हवामानाला तोंड देऊन अधिकचे खत आणि पाणी द्यावे लागत होते. हवामान विभाग किंवा अन्य हवामान वर्तवणाऱ्या कंपन्या असल्या तरी अचूक हवामानाचा अंदाज मिळण्यात अडचणी येत असत. त्यामुळे या गोष्टींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करण्यासाठी सचिन संख यांनी गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करून कर्नाटकच्या बंगळुरू येथील हवामान विभागाशी संलग्न असणाऱ्या एका कंपनीकडून स्वतःसाठी हवामानाचा अचुक अंदाज दर्शवणारे केंद्र विकसित करून आपल्या द्राक्ष बागेत ते उभारले आहे. या हवामान केंद्राच्या माध्यमातून आता सचिन संख यांना वातावरणातील बदलांची तंतोतंत माहिती मिळत आहे. मोबाईलच्या माध्यमातून कोणत्या वेळी पाऊस, वारा, आर्द्रता याशिवाय जमिनीत पिकांना किती पाणी आवश्यकता आहे. तसेच रात्री किती 'दव'पडला आहे या सर्वाची तंतोतंत माहिती मिळते. ज्यामुळे रोगांचा होणारा प्रादुर्भाव टाळण्याबरोबर पिकांची कशा पध्दतीने काळजी घ्यायची याचे योग्य नियोजन करता येत आहे.

हवामान केंद्र ठरतंय फायदेशीर -

याबाबत सचिन संख म्हणाले, संगणक अभियंता पदवी घेतल्यानंतर आपण शेतीकडे वळलो. खरंतर घरची शेती असली तरी आपणाला शेती मधील काहीच माहिती नव्हती. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी म्हणून आपण शेतीकडे वळलो. शेती करताना गेल्या 19 वर्षात अनेक गोष्टी समोर येत गेल्या. ज्यामध्ये पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये बदल करत गेलो. अगदी शेतातील पाणी आणि खत देण्यासाठी ठिबक सिंचन असेल किंवा शेतीचे ऑटोमायझेशन असेल या सर्व गोष्टी केल्या. यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपली शेती हवामानावर अवलंबून आहे. बदलते हवामान हे आपल्या शेतीला आणि उत्पादनाला घातक ठरू लागलेले आहेत. आज शासनाकडून असेल किंवा अन्य कंपन्यांकडून हवामानाचा अंदाज जरी प्राप्त होत असला तरी त्याची इत्यंभूत आणि अचूक माहिती मिळणे अवघड आहे. या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याकडे असणाऱ्या संगणक अभियंता शिक्षणाचा उपयोग झाला. हवामानाची अचूक माहिती कशी मिळवता येईल. यादृष्टीने विचार करत असताना आपले स्वतःचे हवामान केंद्र उभारता येणे शक्य असल्याचे आपले लक्षात आले. त्यांनतर आपण बंगळुरू येथील हवामान केंद्र विकसित करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आपल्याला लागणारे एक अत्याधुनिक, विकसित हवामान केंद्र आपल्या शेतामध्ये उभारले आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - एकनाथ खडसेंविरुद्ध ईडीची कारवाई!.. फार्महाऊस सील केल्याची चर्चा, रोहिणी खडसेंकडून स्पष्टीकरण

अचूक अंदाजमुळे योग्य नियोजन शक्य -

आज या हवामान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला वातावरणातल्या बदलांची अचूक माहिती मिळून, त्या बाबतीत योग्य नियोजन करणे शक्य झाले आहे. त्यातील मुख्य भाग म्हणजे ऊन, वारा, पाऊस याचा अंदाज तर मिळतो. शिवाय रात्रीच्या वेळी हवेत आर्द्रता निर्माण होऊन पानावर जो दव पडतो तो किती आणि कधी पडला याची माहिती मिळते. तसेच गरजेनुसार आपण औषध फवारणी करतो. बऱ्याच वेळा दव पडलेला नसताना नाहक औषध फवारणी केली जाते. त्यामुळे खर्च अधिक होतो. शिवाय त्याचा परिणाम उत्पादनावरही होतो. त्याचबरोबर या हवामान केंद्राचा माध्यमातून पिकांना जमिनीद्वारे किती पाण्याची आवश्यकता आहे, हेदेखील माहिती मिळते. त्यामुळे पाण्याचा अतिरेक वापर आता टाळणे शक्य झाले आहे. शिवाय या हवामान केंद्राच्या परिसरातील 4-5 किलोमीटरच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना या हवामान अंदाजाची माहितीही मिळत असल्याने त्या शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. तर हे हवामान केंद्र उभारण्यासाठी आपल्याला 55 हजार इतका खर्च आला आहे. पण त्यामुळे आता फायदा होत असल्याचे शेतकरी सचिन संख सांगतात.

प्रत्येक शेतकऱ्याने हवामान केंद्र उभारले पाहिजे -

याबाबत सांगलीचे कृषी अधीक्षक मनोज वेताळ म्हणाले, तंतोतंत शेती ही आज काळाची गरज बनली आहे. त्यातुन आज शेतकरी हवामान केंद्र उभारत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. कारण हवामानाच्या आधारित आपली शेती आहे. हवामान केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट त्या शेतकऱ्याला अचूक कळू शकते. यातून पाण्याचा असेल, औषधांचा असेल किंवा अन्य गोष्टींचे नियोजन त्या शेतकऱ्याला त्या-त्या वेळी करणे शक्य होणार आहे. सचिन संख यांनीही ही गरज ओळखून आपल्या शेतात हवामानाचे केंद्र उभारले आहे. इतर शेतकर्‍यांनीही अशाच पद्धतीने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्र उभारली तर त्यांना आपल्या शेतीमालाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबर नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिकचा फायदा होणार आहे, असे मत वेताळ यांनी व्यक्त केले आहे.

गावा-गावात हवामान केंद्र उभारणे गरजेचे -

भारतीय शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर शेती क्षेत्राला आणि मुख्यतः फळबाग शेतीला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा या परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावागावात सचिन संख सारख्या शेतकऱ्याने उभारलेले हवामान केंद्र उभारल्यास शेतकऱ्यांच्यासाठी नक्कीच मोठा आधार देणारे ठरू शकतात.

Last Updated :Sep 29, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.