गोष्ट एका अनोख्या लग्नाची.. 66 वर्षांची नवरी आणि 79 वर्षांच्या नवरदेवाने बांधली लग्नगाठ

author img

By

Published : Sep 22, 2021, 5:52 PM IST

Updated : Sep 22, 2021, 6:43 PM IST

marriage

79 वय असणाऱ्या दादासाहेब यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना एक मुलगा असून, तो त्याच्या प्रपंचात व्यस्त आहे. त्यामुळे दादासाहेब यांना खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले.

सांगली - मिरजेत एक अनोखा लग्नसोहळा पार पडला आहे. 66 वर्षांची वधू आणि 79 वर्षांचे वर बोहल्यावर चढले आहेत. मात्र, हा लग्नसोहळा सुखीसंसारासाठी नव्हे तर आयुष्याच्या वृद्धापकाळात दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांचा आधार मिळावा म्हणून झाला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.

सांगलीत आजी-आजोबांचे अनोखे लग्न
  • एकाकी वृद्धपकाळ करतो निराधार -

लग्न म्हणजे साताजन्माची गाठ आणि सुखीसंसाराची वाट आहे. लग्नानंतर पती-पत्नी हे नातं खऱ्या अर्थाने दृढ होतं. आयुष्याच्या वृद्धापकाळात खरंतर पती-पत्नीचा एकमेकांना आधार असतो. या जोडीतील एखादा साथीदार आयुष्याच्या सरत्या काळात जर निघून गेला तर ते जगणं खूप कठीण असतं.

हेही वाचा - महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर

  • जगण्यासाठी सोबती गरजेचा -

अशीच काहीशी कहाणी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील निवृत्त शिक्षक असणाऱ्या दादासाहेब यांची होती. 79 वय असणाऱ्या दादासाहेब यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना एक मुलगा असून, तो त्याच्या प्रपंचात व्यस्त आहे. त्यामुळे दादासाहेब यांना खूप अडचणी येत होत्या. गेल्या काही वर्षापासून त्यांची जगण्याची फरपट सुरू होती. त्यामुळे एकाकी जगणाऱ्या साळुंखे आजोबांनी आयुष्याच्या सरते शेवटी कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा आधार असावा, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचे निश्चित केले. तशी संमतीही त्यांच्या मुलाकडून मिळवली.

sangli
सांगलीत आजी-आजोबांचे अनोखे लग्न
  • बेघर केंद्रात मिळाली सोबती -

दरम्यान, वयाच्या 79 व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तसेच दादासाहेब साळुंखे हे कुणी उद्योजक किंवा धनाढ्य नव्हते. त्यामुळे त्यांना वधू शोधणे हे खूप मोठे आव्हान होते. शिवाय त्यांच्या वयाकडे बघता, समवय वधू मिळणे अशक्य होते. मात्र, दादासाहेब साळुंखे यांना मिरजेतल्या महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्राची माहिती मिळाली, ज्या ठिकाणी निराधार महिलांचा सांभाळ केला जातो. त्यांनी थेट आस्था बेघर महिला केंद्र गाठले आणि तिथे त्यांना आपल्या जीवनाची सोबती सापडली.

  • निराधार जगण्याला आस्था बनले आधार -

आस्था बेघर केंद्राच्या प्रमुख असणाऱ्या सुरेखा शाहीन शेख यांनी दादासाहेब साळुंखे यांच्याकडून त्यांचे विचार आणि मत जाणून घेतले. त्यानंतर त्यांना बेघर केंद्रात असणाऱ्या शालिनी या 69 वर्षीय महिलेची गाठ घालून दिली. मग दोघांचे विचार जुळले व एकमेकांचे विचार, सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला. शालिनी या पुणे जिल्ह्यातल्या पाषाण येथील असून, त्यांचे पती आणि मुलाचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर त्या निराधार बनल्या होत्या. त्यातून त्यांनी मिरजेच्या आस्था बेघर केंद्राचा आसरा घेतला. काही वर्षांपासून त्या आस्था बेघर निवारा केंद्रामध्ये आपले आयुष्य जगत होत्या.

आजी-आजोबांचे अनोखे लग्न पडले पार
  • वयाची बंधने झुगारून बोहल्यावर -

निराधार असलेल्या शालिनी आणि सोबतीची गरज असणारे दादासाहेब साळुंखे हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. आस्था बेघर केंद्रामध्ये मोठ्या आनंदात वयाची बंधने झुगारून हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. याप्रसंगी साळुंखे यांचे पाहुणे, बेघर केंद्रातील समदुःखी महिला यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाजसुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार व वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकत हा विवाह संपन्न झाला.

  • एकमेकांसाठी ते बनले आधार -

बेघर केंद्रात राहणाऱ्या शालिनी यांच्या मनातही कधी आपल्या आयुष्याच्या वृद्धापकाळात पती नावाचा साथीदार मिळेल, असा विचार देखील आला नव्हता. पण दादासाहेब साळुंखे यांच्या रूपाने त्यांना सोबती मिळाला आहे. या दोघांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. यामुळे परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण व कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देऊन केलेल्या आजी-आजोबांच्या या विवाहसोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - बलात्काराचा बदला? 2 भावांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप, वाचा..

Last Updated :Sep 22, 2021, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.