रत्नागिरी : राजापूर रिफायनरीच्या समर्थनात महिला रस्त्यावर

author img

By

Published : Sep 6, 2021, 3:33 AM IST

ratnagiri

स्थानिकांच्या रोजगारासाठी, गावाच्या विकासासाठी रिफायनरी हवी, अशी मागणी करत आज राजापूरमधील नाटे, बारसू, धोपेश्वर, पन्हळे, राजवाडीमधील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

रत्नागिरी - राजापूरमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत गेल्या काही दिवसांत वातावरण पुन्हा तापू लागले आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक गावे, ग्रामस्थ पुढे येत असतानाच, आता महिलाही यासाठी पुढे आल्या आहेत. कोकणात कोणताही प्रकल्प आला की त्याला पहिला विरोध होते. हा इतिहास पुसण्यासाठी आता महिलावर्ग ही पुढे सरसावला आहे. स्थानिकांच्या रोजगारासाठी, गावाच्या विकासासाठी रिफायनरी हवी, अशी मागणी करत आज राजापूरमधील नाटे, बारसू, धोपेश्वर, पन्हळे, राजवाडीमधील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. महिलाही या प्रकल्पासाठी रस्त्यावर उतरल्याने रीफायनरी पकल्प होण्याच्या आशा अधिकच पल्लवीत झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

महिला उतरल्या रस्त्यावर -

नाणारला रिफायनरी प्रकल्प होणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतल्याने आता एमआयडीसी करीता प्रस्तावित असलेल्या बारसू, सोलगाव, गोवळ गावे आणि लगतची शिवणेखुर्द व सोलगाव परिसरातील जागा या प्रकल्पासाठी अनुकूल असल्याने याठिकाणी प्रकल्प व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे. या ठिकाणी शुन्य विस्थापन आहे. त्यामुळे या परिसरातून रिफायनरी पकल्पासाठी मोठ्या प्रमाणात समर्थन लाभत आहे. मात्र, रिफानरी प्रकल्पासाठी या भागाची चर्चा सुरू होताच प्रकल्प विरोधकांनी या गावांमधील ग्रामस्थांमध्ये प्रकल्पाच्या विरोधात वातावरण तयार करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकल्पविरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आता या परिसरातील महिलांनी आता रस्त्यावर उतरण्यास सुरूवात केली आहे.

'आमच्या मुलाबाळांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे' -

राजापूर तालुक्यातील नाटे, बारसू, धोपेश्वर, पन्हळे, राजवाडी भागातील अनेक महिला आमच्या भागात प्रकल्प आला पाहिजे, आमच्या मुलाबाळांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे, आमच्या सर्व लोकांना रोजगार आरोग्य व शिक्षण यासारख्या चांगल्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे आणि यासाठी आयलॉग जेटी असेल, ग्रीन रिफायनरी असेल असे प्रोजेक्ट आले पाहिजेत. या प्रकल्पांचे आम्ही स्वागत करीत आहोत, अशी भूमिका घेऊन या रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज महिला रस्त्यावर उतरल्या. आमचा हा आवाज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा, अशी विनंती या माध्यमातून यावेळी करण्यात आली.

'एनजीओने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने या भागात फिरकू नये' -

कोकणामध्ये प्रकल्पांना विरोध आहे, अशी भूमिका आतापर्यंत मांडली जात आहे किंवा शासनापर्यंत फक्त विरोधकांचीच बाजू पोहोचवली जात आहे. यासाठी नाईलाजास्तव आम्ही समर्थनार्थ आणि आम्हाला हा प्रकल्प हवा आहे, ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. आता आम्ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपात उतरलो आहोत. परंतु वारंवार जर एनजीओच्या किंवा काही विघ्नसंतोषी पुढाऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्प घालविण्यासाठी कुरघोडी केली जात असेल तर आम्हालाही मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करायला लागेल, अशी भूमिका मांडत या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. तसेच अपप्रचार करणार्‍या कोणत्याही एनजीओने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने या भागात फिरकू नये, असा इशारा देतानाच प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा - राजू शेट्टींनी जलसमाधी घेऊ नये, त्यांची आम्हाला गरज आहे - जलसंपदामंत्री जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.