Uday Samant On Refinery : दादागिरी आणि दडपशाही करून कोणीही रिफायनरीला विरोध करू नये- उद्योगमंत्री उदय सामंत

author img

By

Published : Jan 31, 2023, 4:48 PM IST

Uday Samant On Refinery

दादागिरी आणि दडपशाही करून कोणीही रिफायनरीला विरोध करू नये, ही माझी विनंती आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे, ते आज (मंगळवारी) रत्नागिरीत बोलत होते. याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, रिफायनरीच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा एका मुलाखतीमध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत पत्रकारांना उत्तरे देताना

रत्नागिरी : कुठच्याही परिस्थितीत रिफायनरीच्याबाबतीत आम्ही सकारात्मक पावले टाकतोय. रिफायनरीबाबत शेतकऱ्यांचे जे काही गैरसमज आहेत, ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही यंत्रणादेखील उभी केलेली आहे. पण, दादागिरी आणि दडपशाही करून कोणीही रिफायनरीला विरोध करू नये, अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे आम्ही ऐकायला तयार आहोत. त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत. त्यांना चांगल्या पद्धतीचे पॅकेज द्यायला तयार आहोत.

मंत्री उदय सामंत यांचे आवाहन : सीएसआर ऍक्टिव्हिटीमधून तिथल्या परिसराचा कायापालट करायला तयार आहोत. कौशल्य विकास केंद्र, स्कूल, हॉस्पिटल द्यायला तयार आहोत. तिथल्या जनतेचा पूर्ण उद्धार करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध असताना, दादागिरी करून, जाळून टाकू, फोडून टाकू ही भाषा न करता सरकारबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा करावी असे आवाहन करतानाच रिफायनरीसाठी आम्ही सकारात्मकदृष्ट्या पुढे जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूक आणली : टीका करणारे देखील अनेकवेळा डाओसला जाऊन आलेले आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. जे कोणी टीका करतात त्यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. ते देखील अनेकवेळा डाओसला जाऊन आलेले आहेत असे प्रत्युत्तर उद्योगमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मानसिकता अशी होती की, उद्योजकांमध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे त्यामुळे परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. 1 लाख 40 हजार कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात येताहेत असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरीत जॉब मेळाव्याचे आयोजन : रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण आणि तरुणींना नोकरी मिळण्यासाठी आता उद्योग खात्याच्या वतीने जॉब मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मेळाव्याला भारतातल्या जवळपास 172 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जवळपास पाच ते आठ हजार तरुण-तरुणी यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता, असून पैकी 1800 ते 2000 जणांना 'ऑन द स्पॉट' नोकरी दिली जाणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने जॉब मेळाव्यासाठी नोंदणी होणार असून स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी संधीचा फायदा उठवावा तसेच नोकरी लावून देण्याच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन देखील यावेळी सामंत यांनी केले. रत्नागिरीमध्ये जॉब मेळाव्याचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारे आयोजन केले जाणार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : MPSC Student Protest: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? आजच्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.