कर्जतकर प्रतिक जुईकरांचा युपीएससीत झेंडा, मिळवली १७७ वी रँक

author img

By

Published : Sep 26, 2021, 7:07 AM IST

Pratik Juikar became the first IAS officer in Raigad district

प्रतिक जुईकर यांनी रायगडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. अलिबाग तालुक्यातील एका सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाने युपीएससी परीक्षेत देशात १७७ वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे प्रतिक यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून बी.टेक पूर्ण केले. बी.टेक पूर्ण केल्यानंतर नोकर करत असताना युपीएससी परीक्षेची त्यांनी तयारी सुरु केली. मुळातच अभ्यासात हुषार असलेल्या प्रतिक यांनी आयएएस होण्याची आई-वडीलांची इच्छा पूर्ण केली असून त्यांच्या या यशाबद्दल रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

खालापूर (रायगड) - कर्जत तालुक्यातील प्रतिक जुईकर यांनी रायगडकरांची मान उंचावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात प्रतिक जुईकर यांनी देशात 177 वा क्रमांक मिळवला आहे. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस होण्याचा मानही मिळवला आहे.

मराठी माध्यमातून घेतले शिक्षण

रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी बनलेले प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहिवासी आहेत. प्रतिक यांचे वडील हे कोल्हारे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. एका शिक्षकाच्या मुलाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रतिक हे पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचे असल्याचे त्यांच्या परिचितांनी सांगितले आहे. त्यांना वाचनाची मोठी आवड आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेत झाले. दहावी परीक्षेत कर्जत तालुक्यातून त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. पुढे त्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी.टेक झाले. त्यानंतर नोकरी करत असताना, तेथील मित्र हे आयआयटी करुन युपीएससीची तयारी करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, प्रतिक जुईकर यांनीही युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. प्रतिक यांच्या आई-वडिलांचीही ते आयएएस अधिकारी व्हावे ही इच्छा होती. अथक परिश्रम करीत, प्रतिक जुईकर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : UPSC Success Story : वाशिमच्या अनुजाने युपीएससीमध्ये मिळवली देशात 511 वी रँक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.