रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले सतर्कतेचे आदेश

author img

By

Published : Sep 9, 2021, 3:47 AM IST

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर

आतापर्यंतच्या सर्वाधिक 475 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी कुठे जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रायगड - मुरुड येथे आतापर्यंतच्या सर्वाधिक 475 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी कुठे जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दुर्घटनेची माहिती तात्काळ व्हाट्सअप ग्रुपवर देण्याचे आदेश

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. कल्याणकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी समन्वय ठेवून आपल्या विभागाचे शोध व बचावाच्या आवश्यक साहित्यासह मनुष्यबळ तत्पर ठेवावे. दरडप्रवण व पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत, दर 2 तासांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास माहिती सादर करावी, सर्व दूरध्वनी, मोबाईल सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी, क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहून, सर्व नागरिकांशी व जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहावे. वेळोवेळी पावसाची व एखादी दूर्घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ व्हॉटसॲप ग्रुपवर शेअर करावी, मदतीची मागणी वेळेत करावी, जेणेकरून आपत्कालीन मदत वेळेत पोहोचवण्यासाठी मदत होईल, अशा सूचना दिल्या आहेत.

'प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर'

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील आदड, चिकणी-विहूर पूल खचला असून, भोईघर व वांडेली येथील पूल वाहून गेले आहेत. उसरोली-सुपेगाव रस्ता काही ठिकाणी खचला आहे. या परिस्थितीत प्रशासन सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे असे आश्वासनही डॉ. कल्याणकर यांनी दिले आहे. तसेच, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी कुठे जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.