पेणच्या गणेशमूर्तींना आधुनिकतेचा साज; कापडी शेला, धोतर, फेट्याला मागणी

author img

By

Published : Sep 8, 2021, 8:04 AM IST

Ganesha idols in Pen

गणेशमूर्ती आणि पेण हे आता समीकरणच बनून गेले आहे. येथील आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध आहेत. शाडूच्या मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींचा प्रवास आता इको-फ्रेंडली गणेशमूर्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. पाणीदार आणि जिवंत डोळे तसेच विविध प्रकारच्या रंगसंगतीने या मूर्तींकडे गणेशभक्त आपोआपच आकर्षिले जातात आणि याच लहान मोठया गणेशमूर्ती घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून ग्राहक या पेण नगरीमध्ये येत असतात. विशेष म्हणजे आता महिला गणेश मूर्तीकारांची संख्याही वाढली आहे.

पेण (रायगड) - गणेशमूर्ती आणि पेण हे आता समीकरणच बनून गेले आहे. येथील आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध आहेत. शाडूच्या मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींचा प्रवास आता इको-फ्रेंडली गणेशमूर्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. पाणीदार आणि जिवंत डोळे तसेच विविध प्रकारच्या रंगसंगतीने या मूर्तींकडे गणेशभक्त आपोआपच आकर्षिले जातात आणि याच लहान मोठया गणेशमूर्ती घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून ग्राहक या पेण नगरीमध्ये येत असतात. विशेष म्हणजे आता महिला गणेश मूर्तीकारांची संख्याही वाढली आहे.

Ganesha idols in Pen
पेणच्या गणेशमूर्तींना आधुनिकतेचा साज

आधुनिकतेचा साज-श्रृंगार

मागील अनेक दशकांपासून पेणच्या गणेशमूर्ती प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती, त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती, त्यानंतर इको-फ्रेंडली म्हणजेच कागदाच्या लगद्याच्या मूर्ती असा हा पेणमधील गणेशमूर्तींचा प्रवास सुरु आहे. मात्र आता जसजशी ग्राहकांची क्रयशक्ती आणि राहणीमान आधुनिकतेकडे वाटचाल करायला लागले आहे तसतशी गणेशभक्ताला दरवर्षी मूर्तीमध्ये नाविन्य हवे असते. इतरांच्या मूर्तीपेक्षा आपली मूर्ती आकर्षक कशी दिसेल या स्पर्धेतून मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपण हवे अशी मागणी जोर धरू लागली. गणेश मूर्तिकार देखील ग्राहकांच्या मागणीचा विचार करून अधुनिकतेकडे वळू लागले आहेत. पूर्वीच्या रंगसंगतीला आधुनिकतेची जोड देत, रंगकाम केलेले धोतर, शेले, फेटे यांपेक्षा तेच खरेखुरे कापडी धोतर, शेले, फेटे परिधान करू लागले. मोरपीस, कानातील डुल यांचा वापर करू लागले. मूर्तीच्या मुकुटाला किंवा मातीच्या दागिन्यांना सोनेरी आणि सिल्व्हर शाईचा मुलामा देण्याऐवजी त्याठिकाणी ज्वेलरीचा उपयोग करून दागिने आणि मुकुट तयार केले जाऊ लागले आणि मग आपोआपच मूर्तीवर आधुनिकतेचा साज चढू लागला.

Ganesha idols in Pen
पेणच्या गणेशमूर्तींना आधुनिकतेचा साज

मागणीनुसार कापड आणि दागिने
गणेशभक्तांच्या मागणीनुसार कोणत्या प्रकारची ज्वेलरी पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे कापड मूर्तीला परिधान करायचे हे ग्राहकांच्या पसंतीचे होऊ लागले आहे. गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेला ग्राहक देखील यामुळे खुश होऊ लागला आणि त्यातूनच या प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. एवढेच काय तर आता पेणच्या कारखान्यांमध्ये बाल गणेश मूर्ती देखील तेवढ्याच सुबक आणि मनमोहक अशा बनविल्या जात असल्याने या मूर्ती देखील खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षिले जात आहेत.

Ganesha idols in Pen
पेणच्या गणेशमूर्तींना आधुनिकतेचा साज

महिला मूर्तीकारांची संख्या लक्षणीय

विशेष म्हणजे या कलेमध्ये पुरुष गणेशमूर्तीकारच नव्हे तर महिला गणेश मूर्तिकार देखील तेवढ्याच तरबेज आहेत. आपल्या कारखान्यातील पुरुष मंडळींचा वाढता भार पाहून त्यांना कामात मदत म्हणून या महिला सुरुवातीला किरकोळ काम करीत होत्या. पण आता अगदी सर्व प्रकारचे रंगकाम, यासह अवघड असणारी डोळ्यांची आखणी आणि सध्या ग्राहकांची मागणी असलेली ज्वेलरी करण्यात देखील या महिला माहीर आहेत. महिला मूर्तीकारांची संख्या लक्षणीय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.