Devendra Fadnavis: झोपडपट्टीधारकांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' किंमतीत मिळणार घरं, पाहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री
Published: May 25, 2023, 9:13 PM


Devendra Fadnavis: झोपडपट्टीधारकांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' किंमतीत मिळणार घरं, पाहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री
Published: May 25, 2023, 9:13 PM
मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी चांगली बातमी आहे. कारण 2000 नंतरच्या झोपडपट्टी धारकांना आता अडीच लाख रुपयांमध्ये घर विकत घेता येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार 2000 च्या नंतरच्या ज्या काही झोपडपट्ट्या होत्या त्यांचे पुनर्वसन करणे शक्य नव्हते. 2000 पर्यंतच्या लोकांना मोफत घरे दिली जात होती.
पुणे: देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला की, 2011 पर्यंत प्रोटेक्ट केले. पण कोर्टाच्या निर्णयानुसार 2000 ते 2011 पर्यंत सशुल्क देता येत होते. त्याबाबत दर ठरवायचे होते आणि आता ते ठरविण्यात आले असून अडीच लाख रुपयांमध्ये घर देता येणार आहे. त्यातही त्यांना 'पीए' मिळणार आहे. जेणेकरून त्यांच्यावर जास्त आर्थिक भार येणार नाही. त्यामुळे आता मुंबईतील झोपडपट्टी वासियांसाठी चांगला निर्णय घेण्यात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी संधी गमावली: मुंबई महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, मी हा कायदा मुख्यमंत्री असताना केला. याचे फक्त दर ठरवायचे होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना संधी होती; पण त्यांनी केले नाही. आमचे सरकार आले आणि आम्ही ते दर ठरवले. आम्ही वेगाने निर्णय घेणारे आहोत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
प्रकाश आंबेडकरांविषयी दिली 'ही' प्रतिक्रिया: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे अधून-मधून चांगले संदर्भ देत असतात.
केजरीवाल-पवार भेटीचा परिणाम नाही: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, हे तेच केजरीवाल आहे त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात दहा दिवस आंदोलन केले होते. त्यांनी पवारांना जगातील सर्वांत मोठे काळाबाजारी म्हटले होते आणि ते आता त्यांच्या दारात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात तसेच विदेशात समर्थन भेटत आहे. आपले दुकान बंद होत आहे या भीतीने ते एकत्र येत आहे आणि यांच्या एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नसल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले.
हेही वाचा:
