उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला 9 हजार 200 रुपये विक्रमी दर, पण...!

author img

By

Published : Jul 28, 2021, 4:25 PM IST

सोयाबीनला विक्रमी दर

सोयाबीनचे भाव जरी विक्रमी झाले तरी त्याचा फायदा शेतात राबून घाम गाळत सोयाबीन पिकवणाऱ्या बळीराजाला मिळणार नाही, असेच चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये टाकायला शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उरलेले नाही.

उस्मानाबाद - जिल्ह्यात सोयाबीनच्या दराने विक्रमी उंचाकी गाठली आहे. मंगळवारी कधी नव्हे ते जिल्ह्यात क्विंटल सोयाबीनला 9 हजार 200 रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. जसे कापसाला पांढरे सोने म्हटले जाते त्याच पद्धतीने सोयाबीनला पिवळे सोने म्हटले जाते. या पिवळ्या सोन्याला उस्मानाबाद जिल्ह्यात झळाळी आलेली पाहायला मिळत आहे.

सोयाबीनचे भाव जरी विक्रमी झाले तरी त्याचा फायदा शेतात राबून घाम गाळत सोयाबीन पिकवणाऱ्या बळीराजाला मिळणार नाही, असेच चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये टाकायला शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उरलेले नाही.

देशात सर्वाधिक सोयाबीनचे पीक मध्यप्रदेशमध्ये घेतले जाते. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन हे पीक घेतले जाते. खरीप हंगामात 5 लाखांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली जाते. त्यापैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचे पीक जिल्ह्यात घेतले जाते. मागील काही वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन या पिकावर जास्त भर देत आहे. म्हणून खरिपातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला 9 हजार 200 रुपये विक्रमी द

हेही वाचा- संसदेचे काम चालविण्याची सत्ताधारी पक्षावर अधिक जबाबदारी- संजय राऊत

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना 4 हजार ते साडेचार हजार रुपये इतका भाव मिळाला होता. त्यावेळी चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदित होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन मार्केटमध्ये विकून आपले देणे देऊन घरप्रपंच चालविला. काही उरलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी काही महिने थांबून विकल्याने त्यांना 6 हजारापर्यंत भाव मिळाला. त्यामुळे ते देखील समाधानी होते.

हेही वाचा-जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये ढगफुटी; 4 जणांचा मृत्यू तर 36 बेपत्ता

सोयाबीनची आवकच नाही-

जुलैच्या अंतिम महिन्यात अचानक सोयाबीनच्या भावाने गगन भरारी घेतली. मात्र मार्केटमध्ये टाकायला शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उरलेले नाही. म्हणून या भाववाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. पेरणीसाठी ठेवलेले 50 किलो किंवा क्विंटलभर सोयाबीन सोडल्यास मार्केटमध्ये सोयाबीनची आवकच नाही, असे आडत दुकानदार प्रमोद बालदोटा यांनी सांगितले.

हेही वाचा-2018 ते 2020 काळात नक्षलविरोधी कारवायांमध्ये 625 जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांना नाही तर मग फायदा कुणाला?

गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीनला दर दुप्पट मिळत आहेत. पण त्याचा फायदा सोयाबीन पिकवण्याऱ्या बळीराजाला नाही तर मग कोणाला होत आहे? असा प्रश्न यावेळी पडतो. तर या भाववाढीचा फायदा साठेबाजी करणाऱ्याला लोकांना होत आहे. अनेक धनदांडगे लोक आहेत, त्यांनी हजारो क्विंटल सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे. त्यामुळे त्या लोकांची यंदा चांदी होणार आहे.

सोयाबीनला विक्रमी दर मिळण्याचे कारण काय?

गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या पिकाला चार हजाराच्यांवर दर मिळत नव्हता. मात्र यंदा तो दर 9 हजारांच्या वर गेला आहे. नेमके दरवाढीचे कारण सांगताना कृषी अभ्यासक शिवराज चोंदे म्हणाले की, सध्या आंतराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या तेलाला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात लोकांमध्ये अंडी आणि चिकन खाण्याचे प्रमाण वाढले. पोल्ट्री उद्योगात सोयाबीन हे कोंबड्यांचे खाद्य आहे. पोल्ट्री उद्योगात विक्रमी वाढ झाल्याने कोंबड्यांचे खाद्य असलेल्या सोयाबीनचीही मागणी वाढली, असे चोंदे सांगतात.

नागरिक सध्या पाम तेलऐवजी सोयाबीन तेलाला जास्त पसंती देत आहेत. सरकारने पामतेलाचे आयात शुल्क वाढवल्याने स्थानिक बाजारात सोयाबीन तेलाच्या प्रतिकिलो मागे 40 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या मराठवाडा व विदर्भ येथे पावसात अनियमितता दिसून येत आहे, त्यामुळे पुढील काळात सोयाबीनच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता आहे. सोयाबीनच्या भाववाढीचे हे कारण असू शकतात, असे कृषी अभ्यासक शिवराज चोंदे सांगतात.

या हंगामामध्ये शेतकऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता-

यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पेरण्या उरकल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे एकूण क्षेत्राच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन काढणीला येणार आहे.. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सध्या असलेला दर जरी शेतकऱ्यांना नाही मिळाला तरी यंदाच्या वर्षी 6 हजारापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना सिझनमध्ये मिळेल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्या जरी शेतकऱ्यांना या दराचा लाभ मिळत नसला तरी हंगामामध्ये याचा फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.