प्रभू श्रीरामांचे वास्तव्य असलेल्या रामलिंग देवस्थानाला श्रावण महिन्यात वेगळे महत्व

author img

By

Published : Aug 23, 2021, 4:05 AM IST

Updated : Aug 23, 2021, 7:03 AM IST

Ramalinga Devasthan Shravan importance

हिरवाईने नटलेल्या बालाघाटच्या कुशीत वसलेले श्री. क्षेत्र रामलिंग देवस्थान हे येडशी या गावाजवळ आहे. श्रावण महिन्यात राज्यातील शिवभक्त येथे मोठी गर्दी करीत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे देवस्थान बंद आहे.

उस्मानाबाद - हिरवाईने नटलेल्या बालाघाटच्या कुशीत वसलेले श्री. क्षेत्र रामलिंग देवस्थान हे येडशी या गावाजवळ आहे. श्रावण महिन्यात राज्यातील शिवभक्त येथे मोठी गर्दी करीत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे देवस्थान बंद आहे. या ठिकाणी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण तीन दिवस वास्तव्यास होते आणि रामाने बाण मारलेल्या ठिकाणी आजही पाणी सुरू आहे. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यामुळे या ठिकाणाला 'रामलिंग' असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. म्हणून या तीर्थक्षेत्राची एक वेगळी ओळख आहे.

रामलिंग देवस्थानाचे दृश्य

हेही वाचा - तुळजापूर मंकावती तीर्थकुंड हडपप्रकरणी अखेर आरोपी देवानंद रोचकरीला अटक

मंदिराच्या आजुबाजूला चोहीकडून हिरवा डोंगर आणि त्याच्या मधोमध हे रामलिंग मंदिर आहे. श्रावणमासमध्ये इथे भक्तांची अलोट गर्दी होत असते. हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळाबरोबरच बीड, सोलापूर, लातूर येथील अनेक शिव भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

श्रावण सोमवारी लाखोंची गर्दी; लॉकडाऊनमुळे देवस्थान बंद

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रामलिंग देवस्थान पर्यटकांच्या आणि भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. उस्मानाबाद आणि सोलापूरच्या सीमेवर येडशी गाव परिसरात असलेल्या श्री. क्षेत्र रामलिंग देवस्थानात दरवर्षी श्रावण महिन्यात भक्तांची मोठी गर्दी असते. श्रावणमासाच्या पहिल्या सोमवारपासूनच येथे यात्रा भरण्यास सुरुवात होते. संपूर्ण श्रावणमासात जवळपास आठ ते दहा लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे देवस्थान बंद आहे.

निसर्गरम्य परिसर आणि वानरसेना करते आकर्षित

सोलापूर - धुळे महामार्गालगत असलेल्या या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली असून हा प्रदेश पूर्वीचे दंडकारण्य म्हणूनही ओळखला जातो. धो-धो कोसळणारा धबधबा, चोहोबाजुंनी अभयारण्याचा वेढा असलेले हेमाडपंथी बांधणीचे मंदिर व आसपासच्या परिसरातली नटखट वानरसेना अनेकांना आकर्षित करते.

रामाने बाण मारल्याची आख्यायिका

जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले, तेव्हा जटायू तिला वाचवण्यासाठी आला. रावण आणि जटायूमध्ये युद्ध झाले असता रावणाने जटायूचे पंख छाटले, त्यावेळी जटायू राम..राम.. राम करत या क्षेत्रात पडला होता. त्या वेळेस जटायूच्या अंतिम क्रियेसाठी रामाने या ठिकाणी बाण मारून पाण्याची व्यवस्था केली होती. आजही ते पाणी सुरूच आहे. सध्या ते पाणी तिर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. कितीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तरी हे पाणी आटत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

प्रभू रामांनी लक्ष्मणसोबत केले होते तीन दिवस वास्तव्य

या क्षेत्रात जटायूची समाधी देखील आहे. सीतेच्या शोधात असलेले राम आणि लक्ष्मण हे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्यास होते, असे येथील पुजारी सांगतात. तसेच, सीतेची न्हानी व अनेक रामायण काळातील खुणा या क्षेत्रात पहावयास मिळतात. येथील देवस्थानात असलेल्या शिवलिंगाची पुजा रामाच्या स्वहस्ते करण्यात आली, त्यामुळे या देवस्थानास श्री. क्षेत्र रामलिंग असे नाव पडले असल्याची अख्यायिका आहे.

देवस्थानामुळे दुष्काळी भागाला वेगळी ओळख

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात काही तीर्थक्षेत्र आहेत ज्यांमुळे या जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. मग ते महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठातील एक शक्तिपीठ असलेले आई तुळजाभवानीचे मंदिर असेल अथवा हे ऐतिहासिक ओळख असलेले रामलिंग देवस्थान असेल, यांमुळे इतर जिल्ह्यातील लोकं जिल्ह्यात आवर्जून येतात.

इंग्रजांचा आवडीचा परिसर

रामलिंग हे ठिकाण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. पूर्वी हा भाग पश्चिम महाराष्ट्रात होता. त्याकाळी मराठवाड्यात निजाम आणि या भागात इंग्रज होते. थंड हवेचे ठिकाण असल्याने आरोग्यासाठी इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबासोबत येथे वास्तव्य करत होते. आजही इंग्रजांनी बांधलेले विश्रामगृह मोठ्या दिमाखात उभे आहे. तर त्यांनी त्याकाळी बांधलेले रेल्वे स्थानकाचे काही अवशेषही येथे दिसून येतात.

एकंदरीतच लॉकडाऊन जरी असले तरी श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक आणि पर्यटक येथे दर्शन आणि निसर्ग पाहण्यास येत असतात.

हेही वाचा - अबब...! दुधाला चक्क दहा हजार रुपये लिटर भाव; उस्मानाबादेत भोंगा लावून गाढविणीच्या दुधाची विक्री

Last Updated :Aug 23, 2021, 7:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.