उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश खोसेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Aug 18, 2021, 10:07 PM IST

national teacher award

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावचे जिल्हा परिषद शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे.

उस्मानाबाद - भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने देशातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा गावचे जिल्हा परिषद शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही खोसे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. एका वर्षात खोसे यांना राष्ट्रीय पातळीवरचे दोन पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

तांड्यावरच्या मुलांसाठी 51 ऑफलाईन अॅप्सची निर्मिती -

ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाईलला रेंज नव्हती आशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी 51 ऑफलाईन अॅप्सची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीच पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी तर 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित -

बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहे. त्यांचे 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्रशासनाच्या अॅपवर इ. कंटेंट तयार केले आहेत. त्यांनी व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.

कोरोना काळात खोसे गुरुजींची शाळा 365 दिवस सुरूच -

ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांच्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत. टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अँप्स, गेम्स, टेस्ट तयार केलेल्या आहेत. तसेच कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन 365 दिवस सुरू आहे.

ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा -

मुले दीक्षा अॅप तसेच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. आशा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला आहे. ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे. आयएसओ उपक्रमशील, अॅक्टिव्ह स्कूल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वच स्तरावरून उमेश खोसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.