Nashik Shendripada Bridge: नाशिकचा शेंद्रीपाडा पूल लालफितीत; सरकारकडून निविदांना स्थगिती
Updated on: Jul 27, 2022, 9:46 AM IST

Nashik Shendripada Bridge: नाशिकचा शेंद्रीपाडा पूल लालफितीत; सरकारकडून निविदांना स्थगिती
Updated on: Jul 27, 2022, 9:46 AM IST
नाशिकच्या ( Nashik ) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा गावातला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. शिवसेनेने स्वखर्चातून उभारलेल्या पुलावरून भाजपसह शिंदे गटाकडून टीकेचे सूर उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी नवीन पूल बांधून देण्याची घोषणा केली आहे.
मुंबई - नाशिकच्या ( Nashik ) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा गावात आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या पुढाकाराने उभारलेला पूल, पुराच्या पाण्यात वाहून गेला. शिवसेनेने स्वखर्चातून उभारलेल्या पुलावरून भाजपसह शिंदे गटाकडून यावरून टीकेचे सूर उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी नवीन बांधून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, येथे पूल उभारणीसाठी काढलेल्या निविदांना राज्य सरकारने स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे स्थानिकांना मात्र पुन्हा एकदा जीव धोक्यात घालावा लागतो आहे.
पावसात लोखंडी पूल वाहून गेला - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ( Trimbakeshwar Taluka ) शेंद्रीपाडा येथील महिलांचा लाकडी बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ मे महिन्यात व्हायरल झाला होता. तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः याची दखल घेत शेंद्रीपाड्याला भेट दिली. यानंतर ठाकरे यांच्या पुढाकारने येथे लोखंडी पूल उभारण्यात आला. पाच लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शेंद्रीपाडा पुलाचे ( Shendripada Bridge ) उद्घाटन झाले. मात्र, नाशिक जिल्ह्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात हा लोखंडी पूल वाहून गेला ( Iron Bridge Washed Away ). पूल वाहून गेल्याने आरोप - प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. एकीकडे राजकारणाचा फड रंगला असताना दुसरीकडे स्थानिकांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
निविदा लालफितीत - शिंद्रेपाडा गावात ( Shindrepada village ) पूल बांधण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळापासून जोरदार मागणी सुरू होती. स्थानिकांनी सातत्याने पुलासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला. पुढे सत्तांतर होऊन मविआ सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पूल बांधण्याचे आदेश दिले. पूल अभियंत्यांकडून सुमारे साडेसात लाखाच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे निविदा लालफितीत अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्याने पूल बांधण्याची घोषणा केली असली तरी लालफितीत असलेल्या निविदा मार्गी लावाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल - पूल वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत, तात्काळ पूल उभारणीचे आदेश दिले आहेत. उपअभियंता संजय पाटील, उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून नव्याने पूल बांधणीचा निर्णय घेतला आहे. सुमारे ६ कोटींच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. लवकरच पूल बांधण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
