Ganpati Jayanti 2023 : गणेश जयंतीला संतान सुखासाठी उपासना करावी; महंत अनिकेत देशपांडे

Ganpati Jayanti 2023 : गणेश जयंतीला संतान सुखासाठी उपासना करावी; महंत अनिकेत देशपांडे
आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती,आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला. अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी पती-पत्नीने संतान सुखा साठी व्रत, उपासना केल्यास त्याचा लाभ होईल अशी मान्यता असल्याचा महंत अनिकेत देशपांडे यांनी संगितले.
नाशिक : आजच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष उपासना, अनुष्ठान करावे, स्नान करताना त्यात तीळ टाकून शाही स्नान करावे. आज बुध, अनिकेतू या ग्रहाच्या विशेष कृपेसाठी अर्चना करावी. तसेच उत्तरेला तोंड करून गणपती पुण्याह वाचन नावाचा विधी करावा. ज्यांना संतान सुखामध्ये कमी आहे. त्यांनी या दिवशी उपासना केल्यास त्याचा लाभ होईल असे म्हणत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.
पूजा कशी करावी : एका चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्या. देवघर किंवा पूजा स्थळ फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. गणपतीची मूर्ती एका तान्हानात घ्या. गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करून बाप्पाचा अभिषेक करा. गणपतीला स्वच्छ पुसून लाल कपड्यावर अक्षदा ठेवून त्यावर बप्पाची मूर्ती ठेवा. गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. तसेच गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची फुले, लाल फुले, दूर्वा व्हाव्यात, नैवेद्य म्हणून तिळगुळ किंवा त्याचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे. या दिवशी चुकूनही चंद्र दर्शन घ्यायचे नसते. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
नाशिक मधील गणेश मंदिरे : आज गणेशा जयंती निमित्त नाशिक मधील रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक, मेनराेडवरील गणेश मंदिर, गंगेवरील माेदकेश्वर मंदिर, खांदवे गणपती, दशभूजा गणेश, आनंदवल्लीचा नवश्या गणपती, अशाेक स्तंभावरील डाेल्या गणपती, उपनगरचे इच्छामणी गणेश, इंदिरानगरचे माेदकेश्वर मंदिर यासह शहराच्या विविध भागांतील गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ दिसून येत आहे. गणेश मंदिरांमध्ये सहस्त्रावर्तन, अभिषेक, महापूजा, कीर्तन, प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. भक्त मंडळांच्या वतीने शहरातील विविध मंदिरांमध्ये साग्रसंगीत पूजन, आरतीसह महाप्रसादाचेही आयाेजन करण्यात आले आहे.
माघी गणेश जयंती : पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. तसेच हा शुभ योग आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत बुधवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. यंदा गणेश जयंतीला रवियोग असून, त्यानंतर शिवयोग सुरू होईल. रवियोगात गणपतीची पूजा केल्याने कामातील अडथळे दूर होतील.
