कंधार तालुक्यात नदीच्या पुरात तरुण शेतकरी गेला वाहून; कुरुळा मंडळात पुन्हा अतिवृष्टी

author img

By

Published : Sep 26, 2021, 2:06 PM IST

A young farmer was swept away in a river flood in Kandhar taluka

नांदेड जिल्ह्यातील काही भागात शनिवारी जोरदार पाऊस झाला. कंधार तालुक्यातील नद्या नाल्यांना पूर आला आहे. यातच शनिवारी दृष्टीदोष असलेला एक तरुण गुरांना घेऊन निघाला असताना पाणवंत नदीच्या प्रवाहात वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

नांदेड - जिल्हयातील काही भागात शन‍िवारी (दि.२५) पावसाने हजेरील लावली असून कंधार तालुक्यातील कुरुळा मंडळात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला. यावेळी नदी व नाल्यांना पूर आला असून यात हनमंतवाडी येथील तरुण शेतकरी बबन दत्ता लिंबकर ( वय २३) हा वाहून गेला आहे.

शोधकार्य सुरूच; अद्याप थांगपत्ता नाही

कंधार तालुक्यातील कुरुळा मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. कुरुळा येथून जवळच असलेल्या हनमंतवाडी येथील पाणवंत नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान बबन दत्ता लिंबकर (२३) हा हनमंतवाडी गावातून नदीच्या पलीकडे आपल्या २० ते २२ गुराढोरांसह निघाला. बैल, गायी व इतर गुरे नदीपात्रातून पुढे जात असताना दृष्टीदोष असणाऱ्या बबन लिंबकर याने बैलाची शेपटी धरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे सरकत असतानाच पाण्याचा प्रवाह एवढा होता की, शेपटी हातातून निसटली आणि बबन प्रवाहाबरोबर वाहू लागला. साधारणतः १०० मी पर्यंत बबन दिसला त्यानंतर मात्र बबन पाण्यात बुडाला आणि मग दिसलाच नाही असे हनमंवाडी येथील पोलीस पाटील हणमंत पवार यांनी सांगितले. गावकऱ्यांना ही बातमी समजताच शोधकार्य चालू केले परंतु अद्याप बबनचा थांगपत्ता लागला नाही. ही घटना कंधार तहसील कार्यालयास काळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा : 'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही प्रभाव; राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.