Landslide History : आतापर्यंतच्या भूस्खलनाच्या घटना, जवळपास 7000 हून अधिक मृत्यू

author img

By

Published : Jul 23, 2021, 6:01 PM IST

Landslide History

भारतात आतापर्यंत अनेक भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या आहेत. यात जवळपास 7 हजारांहून अधिक लोकांना जीव गमावावा लागला आहे. देशभरातील दुर्घटनेत माळीण, केदारनाथ, मुंबई, गुवाहाटी, दार्जिलिंग, केरळ आणि मुंबई येथील घटनांचा समावेश आहे.

मुंबई - महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्यात गेली आहेत. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

23 जुलै 2021 - रायगडमध्ये दरड कोसळून 36 मृत्यू

रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळई गावात दरड कोसळली. यात जवळपास 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

18 जुलै 2021 - ठाण्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, 2 जखमी

ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात डोंगरावरील दरड एका घरावर कोसळली. या झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

1) प्रभू सुदाम यादव (वय 45 वर्षे)

2) विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40 वर्षे)

3) रवीकिशन यादव (वय 12 वर्षे)

4) सीमरन यादव (वय 10 वर्षे)

5) संध्या यादव (वय 3 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर याच कुटुंबातील एक पाच वर्षीय मुलगी आणि तिचा भाऊ अचल यादव (१८) हे बचावले आहेत.

29 जुलै 2019 - अटकोनेश्वर नगरमध्ये एकाच कुटुंबातील बाप-लेकाचा मृत्यू, आई जखमी

ठाण्यातील कळवा परिसरातील अटकोनेश्वर नगरमधील आदर्श चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळला. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. मृतांमध्ये बीरेंद्र जसवार (४०) आणि त्यांचा मुलगा सनी जसवार (१०) यांचा समावेश आहे. तर, सनीची आई नीलम जसवार या जखमी झाल्या.

19 जुलै 2015 -

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली. या दुर्घटनेत 3 ठार झाले. लोणावळ्याजवळील आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली होती. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

30 जुलै 2014 - माळीण दुर्घटना, 151 मृत्यू

पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेले होते. परंतु त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवनच संपुष्टात आले. 30 जुलै 2014 रोजी नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला. मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झाले. या दुर्घटनेत जवळपास 151 लोकांचा मृत्यू झाला. तर सुमारे 300 जनावरे दगावली.

जुलै 2000 -

मुंबईमध्ये 2000 मध्ये भूस्खलन झाले होते. पावसामुळे मुंबईत ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर भूजलपातळी वाढली होती. यात जवळपास 67 लोकांचा मृत्यू झाला होता. तर लोकल रेल्वेंचेही नुकसान झाले होते.

आतापर्यंत भारतात दरडी कोसळल्याच्या घटना : -

गुवाहाटी भूस्खलन -

आसाम राज्यातील गुवाहाटी येथे 18 सप्टेंबर 1948 रोजी जोरदार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात सुमार 500 लोकांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार, या भूस्खलन दुर्घटेत अख्ख्येच्या अख्ये एक गाव दबले गेले होते.

दार्जिलिंग भूस्खलन -

4 ऑक्टोबर 1968 रोजीच्या दरम्यान पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग येथे महापुरामुळे दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेत 60 किलोमीटरचा रस्ता 91 ठिकाणी तुटला होता. रिपोर्टनुसार, हजारो लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

मलपा भूस्खलन, उत्तराखंड -

1998 मध्ये 11 ते 17 ऑगस्ट या दिवसात उत्तराखंड राज्यातील मलपा गावात रोज दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत जवळपास 380 लोकांचा मृत्यू झाला. कारण, येथे झालेल्या भूस्खलनात संपूर्ण गाव वाहून गेले होते. हे भूस्खलन भारतातील भीषण भूस्खलनांपैकी एक आहे.

अंबुरी भूस्खलन, केरळ -

केरळ राज्यातील अंबुरी येथे 9 नोव्हेंबर 2001 रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. या घटनेत सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हे भूस्खलन केरळच्या इतिहासातील सर्वात खराब भूस्खलन म्हणून ओळखले जाते.

केदारनाथ दुर्घटना -

उत्तराखंड राज्यातील केदारनाद मंदिर सर्वत्र प्रसिध्द आहे. येथे 19 जून 2013 रोजी महापूर आला होता. हा महापूर अंगावर काटे आणणारा होता. या दुर्घटनेत तब्बल 5 हजार 700 लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, सुमारे 4 हजार 200 गावे नष्ट झाली होती. महापूर आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे ही दुर्घटना घडली होती. दरम्यान, या घटनेवर 'केदारनाथ' चित्रपट बनवण्यात आला. यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी भूमिका साकारली आहे.

हेही वाचा - Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 54 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.