Jayant Patil on Shivsena VBA Alliance : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही : जयंत पाटील

Jayant Patil on Shivsena VBA Alliance : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही : जयंत पाटील
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यांनी शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नसल्याचे सांगितले. आमच्या मित्रपक्षांनी कोणाशीही युती केली तरी आमची हरकत नसल्याचे सांगितले.
मुंबई : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करून ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील : कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही. परंतु, मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कसबा व चिंचवडबाबत आघाडीचे पक्ष एकत्र : कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. आघाडी विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहे.
पिं.चिं मनपातील भ्रष्टाचाराची करणार चौकशी : सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करीत आहे. मात्र, खरी चौकशी तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली, तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे, हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसची आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात सध्या जे प्रश्न सुरू आहेत त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
