दिवाळीनंतर महाविद्यालय होणार सुरू, पण... - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Sep 30, 2021, 5:23 PM IST

मंत्री उदय सामंत

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याच दरम्यान, दिवाळी आल्याने महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू केली जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पण, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात यायचे की नाही, हे ऐच्छिक असेल. सक्ती कोणत्याही विद्यार्थ्यांवर नसेल, असे स्पष्टीकरण मंत्री सामंत यांनी दिले.

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याच दरम्यान, दिवाळी आल्याने महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू केली जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीचा आढावा घेतला जात आहे. राज्य शासन आणि टास्क फोर्सच्या नियमावलीनुसार महाविद्यालये सुरू केली जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयात यायचे की नाही हे ऐच्छिक

कोरोनाच्या संक्रमणामुळे गेले वर्षभर शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीने सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहेत. एक नोव्हेंबरपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीतच दिवाळी आल्याने दिवाळीनंतर प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होतील. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात यायचे की नाही, हे ऐच्छिक असेल. कसलीही सक्ती कोणत्याही विद्यार्थ्यांवर नसेल, असे स्पष्टीकरण मंत्री सामंत यांनी दिले.

प्राध्यापक भरती प्रक्रियेला वेग

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे, अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच महाविद्यालये सुरू केले जातील. राज्यात 3 हजार 74 प्राध्यपकांच्या जागा रिक्त आहेत. सीएचबी तत्त्वानुसार प्राध्यपाकांना मानधन दिले जाईल. नुकतीच राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाइल अर्थ विभागाकडे पाठवली जाईल, असे सामंत म्हणाले.

सीईटीची फेर परिक्षा

चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे औरंगाबाद आणि नांदेडमधील विद्यार्थी सीईटी परीक्षेला मुकले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी फेर परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 9 आणि 10 ऑक्टोबरला या परीक्षा होतील. पुन्हा यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास फेर परिक्षा घेण्यात येतील, असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - पोस्टिंग, ट्रान्स्फरबाबत होणार चौकशी? अनिल देशमुख प्रकरणी राज्य गृह विभाग उपसचिवाला ईडीची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.