Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन

author img

By

Published : Jan 23, 2023, 7:55 PM IST

Balasaheb Thackeray Jayanti

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोमवार (दि. 23 जानेवारी)रोजी विनम्र अभिवादन केले आहे. मुंबईतील फोर्ट परिसरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनीमित्त मुंबईत शिवाजी पार्के येथे कार्यकर्ते आणि नेते अभिवादन करण्यासाठी जात आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा शिवाजीपार्क येथे जाणे टाळले आहे. फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख पदाचा कार्यकाल आज संपत असल्याने, आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेनेच्या हक्कावरून अधिक संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे आता शिल्लक सेनेचे प्रमुख असल्याची टीका करण्यात येत आहे.

तैलचित्राच्या अनावरणाला अनुपस्थित राहण्याची शक्यता : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधीमंडळातील मध्यवर्ती सभागृहात अनावरण होत आहे. या अनावरणासाठी विधानसभा अध्यक्षांनी निमंत्रण देवूनही ठाकरे परिवारातील सदस्य गैरहजर राहण्याची शक्यता आहे. कारण गद्दारांच्या हस्ते बाळासाहेबांच्या तैलचित्राचाचे अनावरण मान्य नसल्याचे ठाकरे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी मान्यवरांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले : बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. (दि. 23 जानेवारी) हा दिवस सर्वच शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मुंबईत राज्यभरातून शिवसैनिक आज बाळासाहेबांना अभिवादन करतात. सर्वांसाठीच आजचा बाळासाहेबांचे स्मरण करण्याचा आहे. या दिवशी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन आज केले जाते. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

जनतेच्या हितासाठीचे निर्णय घेतले : अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेवरच सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. गेल्या 5-6 महिन्यात बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचे निर्णय या सरकारने घेतले. सर्वांना आपले वाटणारे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, समाज घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आले पाहिजे, अशी भावना बाळासाहेबांची होती, त्या विचारांची भूमिका शिंदे-फडणवीस सरकार पुढे घेऊन जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा : बाळासाहेबांची जयंती! नारायण राणेंचे भावनिक पत्र; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.