Panvel To Borivali Railway: पनवेल, नवी मुंबईतून थेट बोरिवलीपर्यंत रेल्वेने जाता येणार

Panvel To Borivali Railway: पनवेल, नवी मुंबईतून थेट बोरिवलीपर्यंत रेल्वेने जाता येणार
मुंबईत प्रवासासाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मुंबईमध्ये हार्बर मार्गावरून पनवेल, नवी मुंबई येथून पश्चिम रेल्वे मार्गावर जाण्यासाठी वडाळा मार्गे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या गोरेगावपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. ही रेल्वे सेवा आता बोरिवलीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत थेट जाता येणार आहे.
मुंबई : मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा चालवली जाते. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जत खोपोली कसारापर्यंत लोकल ट्रेनची सुविधा आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथून विरार पर्यंत ट्रेन सेवा आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नवी मुंबई ते पनवेल पर्यंत तसेच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव पर्यंत रेल्वे सेवा आहे. हार्बर मार्गावरून पनवेल येथून वडाळा मार्गे गोरेगाव पर्यंत सध्या रेल्वे सेवा सुरू आहे.
पश्चिम रेल्वेचे प्रयत्न : नवी मुंबईपासून पनवेल पर्यंत नव्याने शहरीकरण झाल्याने लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. पश्चिम मार्गावरील रेल्वे सेवा गोरेगाव पर्यंत आहे. ही सेवा बोरिवली पर्यंत वाढवल्यास लाखो प्रवाशांना लाभ होणार आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली पर्यंत वाढवण्यासाठी परिवहन विभागाला पात्र लिहिले आहे. एमयूटीपी-३ अंतर्गत हार्बर मार्गाचे विस्तारीकरण बोरिवलीपर्यंत करण्याची योजना आहे.
८२५ कोटी रुपयांचा खर्च : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहाव्या रेल्वे मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खार ते गोरेगाव दरम्यानचा मार्ग मार्च २०२३ पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव ते बोरीवली मार्ग मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गोरेगाव ते बोरिवली या सात किमीच्या अंतराच्या विस्तारासाठी अंदाजे ८२५ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
असा असेल मार्ग : सहाव्या मार्गीकेसाठी भूसंपादन आणि झाडांचे सर्व्हेक्षण करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. गोरेगाव आणि बोरिवली या मार्गावर अनेक ठिकाणी कमी जागा उपलब्ध आहे. कमी जागा उपलब्ध असल्याने काही ठिकाणी उन्नत म्हणजेच पूल बांधून त्यावरून रेल्वे चालवली जाणार आहे. तसेच भविष्यात बोरिवलीपासून विरारपर्यंत करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे नियोजन असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या नवीन सेवेमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.
हेही वाचा : Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन
