अभिनेता समीर कोचरची बिल्डरकडून फसवणूक, गुन्हा दाखल

अभिनेता समीर कोचरची बिल्डरकडून फसवणूक, गुन्हा दाखल
Samir Kochhar : अभिनेता आणि प्रसिद्ध समालोचक समीर कोचरची बिल्डरकडून फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यानं मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
मुंबई Samir Kochhar : अभिनेता आणि आयपीएलचा समालोचक समीर कोचर याला एका बिल्डरनं घर घेताना फसवलं. या प्रकरणी उच्च न्यायालयात यापूर्वीच खटला दाखल आहे. समीर कोचरनं बिल्डर प्रोनीत नाथ याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता.
अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल : आता या प्रकरणी समीर कोचर यानं बिल्डर प्रोनीत नाथ विरोधात मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. २१ नोव्हेंबर रोजी कलम ४२० अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला. आता हा एफआयआर न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असं समीर कोचरच्या वकिलांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण : समीर कोचर यानं प्रोनीत नाथ याच्यावर फ्लॅट खरेदी दरम्यान फसवल्याचा आरोप लगावलाय. कोचर यानं आपल्या दाव्यात नमूद केलं आहे की, ज्या फ्लॅट विक्री संदर्भातील कागदपत्रं त्याच्यासमोर होती त्यावर बिल्डरनं स्टॅम्प ड्युटी वगैरे इत्यादी काहीही लावलेलं नव्हतं. तसेच त्यावर सेल डिड नोंदणी देखील नव्हती. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा आरोप करत, समीर कोचर यानं बिल्डर प्रोनीत नाथच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अंधेरी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ४२०, १२० (ब) आणि ४०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर पुरावा म्हणून सादर करणार : या प्रकरणी समीर कोचरचे वकील प्रेरक चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, "२१ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जो करार घर खरेदी करण्यासंदर्भात करण्यात आला होता, त्याचं उल्लंघन झालं आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. म्हणूनच त्या संदर्भातल्या आयपीसी कलमांनुसार अंधेरीत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे आता हा एफआयआर पुरावा म्हणून आम्ही न्यायालयात सादर करू", असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
