Health Recruitment News : राज्यभरातील रुग्णालयामधील ५ हजार पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरली जाणार, वर्षाला १०९ कोटींचा खर्च

Health Recruitment News : राज्यभरातील रुग्णालयामधील ५ हजार पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरली जाणार, वर्षाला १०९ कोटींचा खर्च
राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेद व होमोओपॅथिक महाविद्यालये व रुग्णालयातील क व ड गटातील पदे रिक्त आहेत. २७ संस्थांमधील ही रिक्त असलेली ५ हजार कुशल व अकुशल असलेली पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याचा तसेच यासाठी दरवर्षी १०९.५२ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने घेतला आहे.
मुंबई : आरोग्यक्षेत्रात नोकरीची संधी हवी असलेल्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेद व होमोओपॅथिक महाविद्यालये व रुग्णालयातील क व ड गटातील पदे रिक्त आहेत. २७ संस्थांमधील ही रिक्त असलेली ५ हजार कुशल व अकुशल असलेली पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५०५६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा : राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमोओपॅथिक महाविद्यालये व रुग्णालयातील क व ड गटातील कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामधील ५०५६ पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाने राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे ११ जानेवारीला मंजुरीसाठी पाठवला होता. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील रुग्णालये आणि महाविद्यालये यामधील क आणि ड विभागातील ५०५६ पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या नियमांचे करावे लागणार पालन : रुग्णालये आणि महाविद्यालये यामधील रिक्त असलेली ५०५६ पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरताना शासनाच्या ६ डिसेंबर २०२२ च्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नियमित पदे भरल्यावर जितका खर्च होणार आहे. त्यापेक्षा २० ते ३० टक्के बचत होणे आवश्यक आहे. ५०५६ पदे भरताना होणारा खर्च वेतन या शीर्षकाखाली खर्च न करताना कंत्राटी सेवा या शीर्षकाखाली खर्च करावा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला दिले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार हे लाभ : वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल यामध्ये बाह्य स्त्रोत पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करताना शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे वेतन व भत्त्यांची तसेच वेळोवेळी लागू असलेले करांची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे. सेवा पुरवठा करणाऱ्या कंत्राट दाराने मनुष्यबळाला देय असलेले कायदेशीर दायित्व म्हणजेच भविष्य निर्वाह निधी बोनस इएसआयसी लेबर वेल्फेअर फंड रजा रोखीकरण इत्यादीचा समावेश वेतनात अंतर्गत करावा, असे आदेशही देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणी भरली जाणार पदे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, गोंदिया, बारामती, अलिबाग, नंदुरबार, सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया, बारामती, अलिबाग, नंदुरबार, सातारा, जळगाव. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ट्रॉमा केअर नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्व उपचार रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ट्रॉमा केअर सेंटर कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय औरंगाबाद, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय बारामती यांचा समावेश असणार आहे.
भरली जाणारी एकूण पदे - ५०५६
- कुशल - १२०३
- अकुशल - १८३६
- अर्धकुशल - २०१७
