लिफ्ट न दिल्याने दगडाने ठेचून खून; देवणीच्या खूनाचा 'एलसीबी'कडून उलगडा

author img

By

Published : Jul 8, 2021, 7:16 AM IST

Priority : Normal

दीड महिन्यांपुर्वी एका टेम्पो चालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना 15 जूनच्या रात्री देवणी तालूक्यातील वलांडी शिवारात घडली होती. तब्बल दीड महिन्यानंतर या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

देवणी/लातूर - गत दीड महिन्यांपुर्वी एका टेम्पो चालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना 15 जूनच्या रात्री देवणी तालूक्यातील वलांडी शिवारात घडली होती. तब्बल दीड महिन्यानंतर या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बालाजी शेषेराव बनसोडे (वय 35) असे मृताचे नाव आहे. मृत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील रहिवासी होते.

बालाजी शेषेराव बनसोडे यांचा 15 जूनच्या रात्री वलांडीच्या शिवारात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचे ओळखपत्र, मोबाईल, गाडीचे कागदपत्र व महिंद्रा पिकअप टेम्पो घेऊन आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी देवणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी या गुन्हाचा उलगडा करण्यासाठी विशेष पथके पाठवली होती. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पथकाने प्राप्त गोपनीय व विश्वसनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी (वय 29), ज्ञानेश्वर भारत बोरसुरे (वय 21) यांना देवणी तालुक्यातील हेळंब येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, 'आम्हाला उदगीर येथे जायचे असल्याने आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याच्या वाहनास आडवे येऊन हात करून थांबविले होते. त्याच कारणावरून आमच्यात वाद झाला व त्या कारणावरून आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले होते. त्यात तो मरण पावला. नंतर त्यास उचलून एका शेताच्या बांधाच्या बाजूला टाकले व त्याचे खिशातील मोबाईल फोन, पाकीट व त्याचे वाहन घेऊन फरार झालो होतो,' अशी कबुली दिली आहे.

लिफ्ट न दिल्याने दगडाने ठेचून खून..

तब्बल दीड महिन्याच्या या संपुर्ण तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार राजेंद्र टेंकाळे, रामहरी भोसले, राहुल सोनकांबळे, सदानंद योगी, योगेश गायकवाड ,सचिन धारेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खान, चालक अमलदार जाधव तसेच सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलीस हवालदार संतोष देवडे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी,गणेश साठे, रियाज सौदागर,शैलेश सुळे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामठेवाड करित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.