Latur Crime : लातुरात पोलिसांवर आरोपीचा हल्ला; स्वसंरक्षणार्थ पोलिसाचा गोळीबार, आरोपी गंभीर

author img

By

Published : Jun 2, 2022, 9:21 PM IST

Latur Crime

खून करून पोलिसांच्या कोठडीतून पळून जाऊन फरार झालेल्या गुन्हेगारास लातूर (Latur Police) येथील त्याच्या भाड्याच्या घरात पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावर आरोपीने खुनी जिवघेणा हल्ला केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱयाने गोळीबार (Police firing on Accused) केला.

लातूर - दोन खून करून पोलिसांच्या कोठडीतून पळून जाऊन फरार झालेल्या गुन्हेगारास लातूर (Latur Police) येथील त्याच्या भाड्याच्या घरात पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावर आरोपीने खुनी जिवघेणा हल्ला केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱयाने गोळीबार (Police firing on Accused) केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे.

काय आहे प्रकरण - सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चापोली शिवारात खदाणीत नेऊन जागेच्या वादावरून एकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयावरून मुख्य सूत्रधार नारायण तुकाराम इरबतनवाड यास चाकूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 24 मार्च,2022 रोजी पहाटे पाच-साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून आरोपी इरबतनवाड पोलीस कोठडीतून पळून गेला होता. याही प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळपासून इरबतनवाड हा हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात जाऊन पोलिसांना गुंगारा देत होता. चाकूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांचे सहकारी मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी त्याचा शोध घेत होते.

मुख्य सूत्रधार आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड व इतरांनी जागेच्या वादातून कट रचून सचिन उर्फ लालू शिवसांब दावनगावे (वय 26 रा. शिरूर ताजबंद) यास चापोली शिवारातील खदानीत नेऊन विळा व धारदार हत्याराने गळा चिरून खून केला होता. प्रथमत: मृताची ओळख पटत नव्हती. चाकूर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने ओळख पटवली. दरम्यान, अन्य दहा जणांना अटक करण्यात आली होती. पण पोलिसांच्या कोठडीतून नारायण तुकाराम इरबतनवाड पळून गेला होता.

गोळीबारात आरोपी गंभीर - या प्रकरणातील तपासीक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांना फरार मुख्य आरोपी इरबतनवाड लातूर येथील श्रीनगर भागात भाड्याच्या घरी आला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ लातूरच्या श्रीनगर भागातील घर गाठले. आरोपी नारायण इरबतनवाड हा त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याची खात्री पोलीसांना पटली. तात्काळ पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी आरोपीच्या घराच्या दारात उभा राहून त्यास आवाज दिला. घरात पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपीने मोहिते यांच्यावर झडप मारली. दोन्ही हाताने त्याने अधिकाऱ्याचा गळा आवळला. त्याचवेळी आरोपीने मोहिते यांच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता एका हाताने गळा घट्ट आवळून दुसऱ्या हाताने पोलीस अधिकारी यांचे रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मोहिते यांनी सावधपणे स्वसंरक्षणार्थ आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड याच्या कमरेच्या खाली गोळी झाडली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते हेही यात जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार चालू आहेत. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला, पोलीस अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, गुप्तांगावर मुका मार दिला, शर्ट फाडले, ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पोलीस अधिकारी-कर्मचा-यांवरील हल्ले खपवून घेणार नाही : निखील पिंगळे - Conclusion:पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, त्यांचे सहकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, सायबर क्राईम , चाकूर पोलीस, वरिष्ठ अधिकारी व इतर अंमलदार यांचे पोलीस अधिक्षकांनी कौतुक केले आहे. या प्रकरणातील जखमी झालेला आरोपी नारायण तुकाराम इरबतवाड याच्यावर उपचार झाल्यानंतर त्यास अटक केल्यानंतर हा व्यक्ती अंमली पदार्थ व्यापाराशी संबंधीत तर नाही ना याबाबत चौकशी करण्यात येईल. पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्यावर हल्ले खपवून घेणार नाही,असे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन , पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.