गव्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील घटना

गव्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील घटना
वाघवे गावाच्या डोंगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून 25 हुन अधिक गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली.
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावाच्या परिसरात गव्याच्या हल्ल्यात घोडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. बाहेर गावचे धनगर बांधव आपल्या बकरी घेऊन वाघवे येथे आले होते. सोबत घोडी सुद्धा होती. मात्र पहाटेच्या सुमारास गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी घोडीचा शेवटी उपचाराविना मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस पाटील गणेश पोवार, धनगर खाणू पुजारी आणि ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरुन माहिती दिली. तरीही ते घटनास्थळी न आल्याने घोडीला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाघवे गावाच्या डोंगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून 25 हुन अधिक गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली. दरम्यान, गुरुवारी रात्री खाणू यशवंत पुजारी (रा.पोर्ले तर्फ ठाणे) यांनी वाघवे गावाच्या परिसरात एका शेतकऱ्यांच्या रानात बकऱ्यांचा तळ बसवला होता आणि इतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेजारील मोकळ्या राणात दोन घोड्यांना बांधले होते.
दरम्यान आज सकाळी 7 वाजता धनगर खाणू पुजारी घोडी आणायला गेल्यावर त्यांच्या घोडीवर गव्याने हल्ला केल्याने घोडी जखमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलीस पाटील आणि धनगरांनी उपचारासाठी पडळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. सकाळी 7 पासून 12 पर्यंत वारंवार फोन करुनही डॉक्टर न आल्याने शेवटी या जखमी घोडीचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर वनविभागाचे पथक दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
