माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ

author img

By

Published : Sep 13, 2021, 5:06 PM IST

Updated : Sep 13, 2021, 6:27 PM IST

न

भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप सोमैया यांनी केला. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच सोमैया यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर - भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हणाले.

बोलताना मंत्री मुश्रीफ

आरोप बिनबुडाचे

आपल्यावरील आरोपांनंतर प्रत्युत्तर देताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमैया हे बिचारे आहेत. त्यांना याबद्दल काहीही माहिती नाही. ते कोल्हापूरला आले असते तर त्यांना नेमकी परिस्थिती समजली असती. किरीट सोमैया यांचा बोलवता धनी हे चंद्रकांत पाटीलच आहेत. त्यांच्या सांगण्यावरुनच किरीट सोमैया यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना कारखान्याचे नाव सुद्धा नीट घेता आले नाही. त्यामुळे हे सगळे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकात पाटील व समजितसिंह घाटगे यांनी दिलेल्या माहितीवरुन आरोप

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी माझ्या घरासह कारखाना आणि इतर सर्वच घरांवर एकाच वेळी छापा टाकला होता. त्यामध्ये त्यांना काहीही सापडले नाही. तेव्हा ईडीला जे काही प्रश्न होते त्याची आम्ही उत्तरं दिली आहेत. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता अडीच वर्षानंतर काहीही कारवाई नाही. त्यात किरीट सोमैया मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहाराबाबत आरोप करत आहेत. त्यांनी याचा कुठून शोध लावला विचारायला हवे. त्यांना कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांनी हे आरोप केले आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमैया यांना काही माहिती नाही, त्यांच्या सीएच्या पदवीवरच शंका

ज्या कारखान्याबाबत सोमैया यांनी आरोप केले आहेत, त्या कारखान्यात हजारो शेतकऱ्यांनी पाच रुपये, दहा रुपये गोळा करत पैसे दिल्यानंतर हा कारखाना उभा केला आहे. त्यावेळी जेव्हा हा कारखाना सुरू करण्यासाठी परवाना मिळाला तेव्हा लोकांना आवाहन करताच एका दिवसात 17 कोटी रुपये जमा झाले होते. जिल्ह्यातील काही बँकांकडून पैसे मोजायचे मशीन आणून चार दिवस हे पैसे मोजायचे काम सुरू होते. हजारो शेतकऱ्यांच्या मदतीनेच कारखाना उभारला. त्यावेळी तक्रारीनंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. पण, त्यांनाच आश्चर्यचा धक्का बसला, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. शिवाय काही बँकाकडून कर्ज काढले त्याची कर्जफेडही झाली आहे. याबाबत किरीट सोमैया यांना काही माहिती नाही. उगाच कोणी काही माहिती दिली म्हणून काहीही आरोप करणे चुकीचे आहे, त्यांनी असे करू नये. कदाचित मला त्यांच्या सीएच्या पदवीवरच शंका येत असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हणाले.

मुश्रीफ यांच्यावर सोमैया यांनी केलेल आरोप

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकत्ता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. या सर्व घोटाळ्याची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांचीही चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सोमैया म्हणाले.

हेही वाचा - मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा? २७०० पानांचे पुरावे सोमैय्यांनी दिले आयकर विभागाला

Last Updated :Sep 13, 2021, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.