जालना Dhangar agitation in Jalna : मराठा ओबीसी बरोबरच आता धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यात धनगर समाजानं आज जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषा करुन येऊन मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिलांसह लहान मुले तसंच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. धनगर समाजास अनुसूचित जातीचं आरक्षण मिळावं, त्याची ताबडतोब योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. ही मागणी प्रामुख्यानं यावेळी धनगर समाजाकडून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी कलेक्टरची गाडी फोडली आहे.
जालन्यात धनगर समाजाचा मोर्चा - ज्या संविधानावर हा देश चालतो, त्या संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश केलेला आहे. पण गेल्या ७० वर्षात इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी समाजाला या लाभापासून वंचित ठेवलं आहे. तर २०१४ ला भाजपाने सत्तेत येत असताना त्यावेळी आश्वासन दिलं होतं की, आम्ही सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू. मात्र अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे.
ST प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा - आरक्षण मिळेल यासाठी नुसताच शब्द देण्यात आला. त्यानंतर २०१४ तसंच २०१९ च्या निवडणुका होऊन गेल्या. तरीही धनगर समाजाला ST प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या आधी आमच्या हाती ST प्रमाणपत्र द्या. नाहीतर तुमच्या खुर्च्या रिकाम्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया आज जालना येथे आयोजित धनगर समाजाच्या मोर्चात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी दिल्या आहेत.
घरी पाठवू एवढं लक्षात ठेवा - तुम्ही आम्हाला वेडे समजू नका, नाहीतर निवडणुकीत तुमच्या पार्श्वभागावर लाथा मारून तुम्हाला घरी पाठवू एवढं लक्षात ठेवा, असा इशारा धनगर आंदोलकांनी दिला आहे. आज जालन्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. जालना शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. शनी मंदिर उड्डाण पूल नूतन वस्ताद अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षण अंमलबजावणीसाठी हा मोर्चा शहरातून काढण्यात आला.
हेही वाचा