जळगावात 21 एकर क्षेत्रात साकारलाय ऑक्सिजन पार्क; एकाच ठिकाणी दीड हजार वटवृक्षांची लागवड

author img

By

Published : Sep 18, 2021, 6:29 PM IST

Updated : Sep 18, 2021, 6:46 PM IST

Oxygen Park in Jalgaon

जळगावातील एक खासगी कंपनी आणि सेवाभावी संस्थेने परस्पर समन्वयातून 21 एकर क्षेत्रावर ऑक्सिजन पार्क साकारला आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे, याठिकाणी दीड हजार वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वटवृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देतात, म्हणून ऑक्सिजन पार्कमध्ये वटवृक्षांचीच लागवड केली आहे.

जळगाव - मानवी जीवनासाठी ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे? हे कोरोना काळात आपल्या लक्षात आले. निसर्गाकडून मोफत ऑक्सिजन मिळतो, हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण हा त्यातलाच एक भाग. हीच बाब लक्षात घेऊन जळगावातील एक खासगी कंपनी आणि सेवाभावी संस्थेने परस्पर समन्वयातून 21 एकर क्षेत्रावर ऑक्सिजन पार्क साकारला आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे, याठिकाणी दीड हजार वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वटवृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देतात, म्हणून ऑक्सिजन पार्कमध्ये वटवृक्षांचीच लागवड केली आहे.

..अशी सुचली संकल्पना -

जळगाव शहरातील सुबोध चौधरी हे उद्योजक आहेत. सुबोनियो केमिकल्स नावाची कंपनी ते चालवतात. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटले. निसर्गाकडून ऑक्सिजन मोफत उपलब्ध होतो. म्हणून जर सर्वांनी वृक्षारोपण केले तर पर्यावरणाचे संवर्धन होऊन ऑक्सिजनचा प्रश्नही सुटेल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. याबाबत त्यांनी मराठी प्रतिष्ठानचे अॅड. जमील देशपांडे यांच्याशी चर्चा केली. देशपांडे यांनाही चौधरींची संकल्पना पटली. 'समाजाचे आपण काही देणे लागतो', या उदात्त भावनेतून त्यांनी स्वतः कृती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऑक्सिजन पार्कची संकल्पना पुढे आली. दोघांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ती प्रत्यक्षात आणली.

जळगावात 21 एकर क्षेत्रात साकारलाय ऑक्सिजन पार्क
गाडेगाव परिसराची केली निवड -
ऑक्सिजन पार्क म्हणजेच वटवृक्ष प्रकल्प उभारण्यासाठी जळगाव शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाडेगावची निवड करण्यात आली. गाडेगाव येथील माळरानात सुबोनियो कंपनीने वृक्षारोपण करण्यासाठी जागा आणि वटवृक्षांच्या रोपांची उपलब्धता करून दिली. तर मराठी प्रतिष्ठानने रोपण केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी उचलली. याठिकाणी 21 एकर क्षेत्रावर दीड हजार वटवृक्षांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, लागवड केलेले वटवृक्ष चांगल्या पद्धतीने व लवकर जगावेत म्हणून ते विशिष्ट पद्धतीने रोपण केले आहेत. वृक्षांना पाणी तसेच विद्राव्य खते देता यावेत, म्हणून खास पद्धत वापरली आहे.

हे ही वाचा - जळगावातील नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीची आहे सर्वदूर ख्याती; 75 वर्षांचा लाभलाय मंदिराला इतिहास

समाजभान जपण्याची गरज - सुबोध चौधरी

या प्रकल्पाबाबत माहिती देताना सुबोध चौधरी म्हणाले की, मानवासाठी ऑक्सिजन किती गरजेचा आहे, हे कोरोना महामारीत सर्वांना कळाले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वटवृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहे, म्हणून आम्ही लागवडीसाठी वटवृक्षांची निवड केली. एकाच क्षेत्रात दीड हजार वटवृक्ष असलेला बहुधा आमचा हा एकमेव प्रकल्प असेल. म्हणूनच आम्ही 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये या कामगिरीची नोंद करणार आहोत. पर्यावरण संवर्धन करणे हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येत आहे. म्हणून वृक्षारोपण करून आपण समाजभान जपायला हवं, असेही सुबोध चौधरी यांनी सांगितले.

हे ही वाचा - जळगाव: सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, आजचे दर

प्रेरणादायी उपक्रम- प्रवीण मुंढे

पर्यावरण संवर्धनासाठी ऑक्सिजन पार्क यासारख्या उपक्रमाची नितांत गरज आहे. आज याठिकाणी दीड हजार वटवृक्षांची लागवड करण्यात आली असून, येत्या 3 ते 4 वर्षांत याचे दृश्य परिणाम दिसतील. हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असे मत यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले. दरम्यान, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे. ऑक्सिजन पार्क यासारख्या संकल्पनेवर इतर समाजसेवी संस्थांनी देखील काम करण्यासाठी पुढे यायला हवे, असे कुलकर्णी म्हणाले.

Last Updated :Sep 18, 2021, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.