सोयाबीनची वाहून जाणारी सुडी पकडण्यासाठी मच्छिमाराचा होडीने चित्तथरारक पाठलाग, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Oct 17, 2021, 5:17 PM IST

Updated : Oct 17, 2021, 6:17 PM IST

Heavy rain in Hingoli

सोयाबीनची सुडी पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून एका मच्छीमार ती सुडी पकडण्यासाठी जीवाची जराही पर्वा न करता होडीच्या साह्याने सुडीचा पाठलाग करीत होता. मात्र त्याला ग्रामस्थांनी पुलावर पकडून त्याचा जीव वाचविला. हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास नऊ तास झालेल्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे हिरावून घेतला आहे. अशीच एक झाकून ठेवलेली सोयाबीनची सुडी पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून एका मच्छीमार ती सुडी पकडण्यासाठी जीवाची जराही पर्वा न करता होडीच्या साह्याने सुडीचा पाठलाग करीत होता. मात्र त्याला ग्रामस्थांनी पुलावर पकडून त्याचा जीव वाचविला. हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हिंगोलीत मुसळधार पाऊस
रामन फकिरराव पावडे असे या मच्छिमाराचे नाव आहे. पावडे हे नदीमध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. जेव्हा कधी नदीमध्ये वाहून आले तर आपल्या जीवाची बाजी लावून त्याला वाचवण्याचा पावडे मोठ्या कसोशीने प्रयत्न करतात. दिवस-रात्र शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मच्छिमार पावडे यांना झाकून ठेवलेली सोयाबीनची सुडी नदीच्या प्रवाहात वाहून जाताना नजरेस पडली. पावडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सुडी वाचवण्यासाठी होडीने तिचा पाठलाग केला. कसेही करून आपण सुडी पकडू, असा ठाम विश्वास डोक्यात ठेऊन तो सुसाट होडी पळवीत होता, तर रस्त्यावरून ये-जा करणारे हा क्षण मोबाईलमध्ये कैद करीत होते. अन् त्याला न जाण्यासाठी विनंती करीत होते, मात्र पावडेचे अजिबात कुणाकडेही लक्ष नव्हते. अखेर पावडे त्या सुडीजवळ पोहोचले मात्र पाण्याचा वेग जास्त अन मच्छिमार पावडे एकटेच त्यामुळे काही केल्या पावडेचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. शेवटी पुलाखालून सुडी वाहुन गेली अन पावडे यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले. पावडे यांना जेव्हा पाण्याबाहेर काढले तेव्हा मात्र त्यांच्यावर सर्वच जण तुटून पडले होते. स्वतःचा जीव महत्वाचा की सुडी, असे एक ना अनेक प्रश्न करून पावडे यांना भांबावून सोडत होते.

हे ही वाचा - Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

शेतकऱ्याने घेतला सुटकेचा श्वास -

डोंगरकडा येथील पवन दारव्हेकर यांची ती दोन एकर मधील कापून टाकलेली सोयाबीनची सुडी होती, तर एक दोन दिवसात मळणी यंत्रातून सोयाबीन काढण्यात येणार होते, मात्र शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे सुडी वाहुन गेली अशातच मच्छिमार पावडे यांनी जीवाची बाजी लावून सुडी वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. मात्र त्यांना शक्य झाले नाही ते नेहमीच कुणाच्या ही मदतीसाठी धावून येतात, मात्र ही घटना फार धोकादायक होती. ते आमची सुडी वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्याची माहिती मिळताच आमचेच ह्रदयाचे ठोके वाढले होते, मात्र ते जेव्हा पाण्याबाहेर सुखरूप निघाले तेव्हा कुठे आम्हाला समाधान वाटल्याचे शेतकरी पवन दारव्हेकर यांनी सांगितले.

Last Updated :Oct 17, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.