Gadchiroli Police Recruitment : गडचिरोली पोलीस दलातील 416 रिक्त पदे भरण्यासाठी गृह विभागाची मंजुरी

author img

By

Published : Mar 24, 2022, 3:53 PM IST

Gadchiroli Police

गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त ( Gadchiroli Police Recruitment ) असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. नुकत्याच केलेल्या गडचिरोली दौऱ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही तरुण तरुणींनी ही बाब लक्षात आणून दिली होती.

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिलेली आहे. गृह विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले असून थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकाना देण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुण आणि तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. नुकत्याच केलेल्या गडचिरोली दौऱ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही तरुण तरुणींनी ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यावेळी त्यांनी ही बाब राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वस्त केले होते.

गृह विभागाने दिली मंजुरी
त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली असून तसे शासन आदेश देखील निर्गमित केलेले आहेत. यानुसार 150 पोलीस शिपाई, 161 पोलीस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलीसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
हेही वाचा - Praveen Darekar Aggressive In LC : दरेकर भडकले! उपसभापतींवर केला पक्षपातीपणाचा आरोप

416 पदे भरण्यात येणार
पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त 311 पदे म्हणजे ( 150 पोलीस शिपाई आणि 161 पोलीस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 अशी 416 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग ( माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक 3 यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.

आदिवासी युवकांना होणार फायदा
मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा मोठा फायदा स्थानिक आदिवासी तरुण तरुणींना होणार असून जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

हेही वाचा - Mahavitaran officers Suspended : महावितरणचे अधिकारी सुमित कुमार निलंबित; उर्जामंत्र्यांचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.