शिक्षणाचा चंद्रपूर पॅटर्न, राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

author img

By

Published : Aug 21, 2021, 2:47 AM IST

चंद्रपूर

राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेट दिली.

चंद्रपूर - राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेट दिली. सध्या कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरु केली. ज्या विद्यार्थाकडे ऑनलाईन सुविधा नाही, अशांसाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण देण्यात आले. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी शिष्टमंडळ चंद्रपूर शहरात आले होते.

शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी आहे. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आहेत. महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगू शाळा शहरात सुरू आहेत. या शाळेत डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केले आहे. त्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळात तेलगू, तीन शाळांमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात आहे. 21 शाळात मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. तर 16 शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे. 2016-17 मध्ये या सर्व शाळांतील विद्यार्थीसंख्या 2571 होती. ती यावर्षी 3454 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, शाखा महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आली. यानिमित्ताने राज्यभरातून आलेल्या नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांनी चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेटी दिल्या. यात सावित्रीबाई फुले शाळा, शहिद भगतसिंग शाळा, महात्मा फुले शाळा यांचा समावेश होता. शिष्टमंडळात प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी (नगर परिषद कराड शाळा जि. सातारा), अरूण पवार (अहमदनगर महानगरपालिका), सुनील खेलूरकर (नाशिक महानगरपालिका), सुभाष कोल्हे (बुलढाणा), साधनाताई साळूंखे (नगरपरिषद खापोली), मायाताई कांबळे (लातूर महानगरपालिका), प्रिया सिंग (औरंगाबाद महानगरपालिका), नंदा तादंळे (नगरपरिषद लोणावळा), सविता बोरसे (नाशिक महानगरपालिका), बाबासाहेब कडकल (नाशिक महानगरपालिका), संग्राम गाढवे (नगरपरिषद कराड) सहभागी झाले होते. चंद्रपूर मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा - सोलापूरमधील चित्रकाराने चित्रातून मांडली अफगाणिस्तानातील परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.