जादूटोणा संशय प्रकरण : शरीरावरील जखमा तर भरतील, पण मानसिक आघाताचे काय?

author img

By

Published : Aug 23, 2021, 10:59 PM IST

alleged black magic practice wani budruk

जादूटोणा, करणी केल्याच्या संशयावरून 7 वयोवृद्ध लोकांना गावातील चौकात बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यातील अनेकांना जबर जखमा झाल्या आहेत. काहींचे हाड देखील मोडले आहेत. या घटनेमुळे सर्व लोकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

चंद्रपूर - जादूटोणा, करणी केल्याच्या संशयावरून 7 वयोवृद्ध लोकांना गावातील चौकात बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यातील अनेकांना जबर जखमा झाल्या आहेत. काहींचे हाड देखील मोडले आहेत. या घटनेमुळे सर्व लोकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. शारीरिक जखमा एक ना एक दिवस भरून निघेल, मात्र या घटनेतून निरपराध लोकांवर जो मानसिक आघात झाला आहे त्याच्या जखमा कधी भरून निघणार, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

माहिती देताना पीडित, पोलीस अधिकारी, अनिस कार्यकर्ता आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - 'पांचसो में बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे'; चंद्रपुरातील खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन

जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (वय ५३), साहेबराव एकनाथ हुके (वय ४८), धम्मशिला सुधाकर हुके (वय ३८), पंचफुला शिवराज हुके (वय ५५), प्रयागबाई एका जबर जखमी झाले.

शनिवारी या गावात दोन महिलांच्या अंगात अचानक देवी आली. या गावावर काही लोकांनी करणी केली आहे, असे सांगत या महिलांनी गावातील पीडित लोकांची नावे घेतली. या सर्व लोकांना गावातील चौकात आणण्यात आले. तिथे त्यांना दोराने बांधण्यात आले आणि त्यांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना जिवती पोलिसांना माहिती झाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मारहाण सुरूच होती. पोलिसांना देखील ही मारहाण रोखण्यात मज्जाव करण्यात आला. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनी पीडितांना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडविण्यात पोलिसांना यश आले.

रविवारी या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लोकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी येथे येऊन लोकांची समजूत काढली, जनजागृती केली. यादरम्यान पोलिसांनी 13 लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या चौकटीत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित घटना घडू नये यासाठी गावात पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. मात्र, या प्रकारामुळे राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला जबर धक्का बसला आहे. त्याचबरोबर ज्यांना मारहाण झाली त्यांना मोठा मानसिक आघात पोहचला आहे.

हेही वाचा - चंद्रपूर : ग्रामविकास संसदीय स्थायी समितीची कोलारा ग्रामपंचायतीला भेट; विविध योजनांचा घेतला आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.